गरजूंना प्रवासी ईपासबाबत तातडीने परवानगी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


-  जिल्हाधिकारी कार्यालयात ईपाससाठी गर्दी न करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा प्रशासनाकडून गरजू व आवश्यक प्रवासासाठी तातडीने परवानगी देली जात आहे. कोणीही जिल्हाधिकारी कार्यालयात ईपास करीता प्रत्यक्ष चौकशीसाठी येवू नये. संयम बाळगा, धीर धरा, घाई गर्दी करून कोरोना संसर्गाला चालना देवू नका. आम्ही गरजू व आवश्यक नागरीकांना तातडीने ई पास देत आहोत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन कामाच्या वेळेत कंट्रोल रूमद्वारे गरजूंना मदत दिली जात आहे. ईपास बाबत चौकशी करण्यासाठी आपण कंट्रोल रूमच्या ०७१३२ २२२५०९ नंबर वर चौकशी करावी. ई पास बाबतची परवानगी गरजेच्या आणि आवश्यक कामांनांच दिली जात आहे. त्यामुळे जो ईपास प्रशासनाकडून नाकारण्यात आला आहे त्यांनी प्रत्यक्ष येवून चौकशी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
अर्ज केल्यानंतर ईपास हा त्याच covid19.mhpolice.in वेबसाईटवर टोकन क्रमांक टाकून मिळतो. आवश्यक वाहन प्रवास व कामाकरीता बाहेर जाण्यासाठी covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ईपाससाठी नोंदणी करा. अर्ज करताना आवश्यक सूचना वाचा. आपण जर जिल्ह्याबाहेर जाणार असाल तर आपणाला याठिकाणी मेडिकल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. यामुळे आपणाला पुढील प्रवासात कोणताही व्यत्यय येणार नाही किंवा आपणाला ईपास देण्याबाबत परवानगी देणे सोईस्कर होईल. सादर केलेल्या अर्जावर प्रशासन आवश्यकतेनुसार परवानगी देत आहे. आपणाला ईपास हा वरील संकेतस्थळावर टोकन क्रमांक टाकून मिळत आहे. जर ईपास प्रशासनाकडून नाकारण्यात आला तर त्याबाबतचे कारणही त्याच ठिकाणी दिले जाते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज नाही असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीमध्ये येण्यासाठी तेथील स्थानिक प्रशासनाजवळ अर्ज करा तसेच नोंदणीही करा

जिल्हयाबाहेरून गडचिरोलीत येण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आहात तेथील प्रशासनाकडे अर्ज करावा. त्यासाठी आवश्यक कार्यवाही तेथील प्रशासन करणार आहे. या जिल्हयात आल्यानंतर संबंधिताची आरोग्यविषयक तपासणी केली जाणार आहे. तसेच क्वारंटाईनही केले जाणार आहे.  

मदत केंद्राच्या दूरध्वनीवरती चौकशी करा माहिती घ्या 

जिल्हा प्रशासन गडचिरोली मार्फत मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मदत केंद्रावर ८ लाईनद्वारे ०७१३२ २२२०३१ या क्रमांकावर आपण मदत मागू शकता. आपणाला जिल्हयाबाहेर जाण्यासाठी तसेच इतर तक्रारीबाबत या संपर्क क्रमांकावर मदत मागा. शाररीक अंतर राखण्यासाठी आपण प्रत्यक्ष कार्यालयात येणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच आपणाला काही इतर अर्ज किंवा ईपासमध्ये अडचणी आल्यास dmcellgadchiroli@gmail.com  किंवा rdcgadchiroli@gmail.com या ईमेलवर अर्ज करता येईल. आलेल्या अर्जाची छाणणी करून संबंधित दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे.

जिल्हयात येणा-यांना होम क्वारंटाईन अनिवार्य 

कोरोना संसर्गाबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार प्रत्येक जिल्हयाबाहेरून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करणे अनिवार्य असणार आहे. जर आरोग्य विषयक लक्षणे आढळून आल्यास संस्थात्मक क्वारंटाईनही केले जाणार आहे.

परराज्यातील नागरीकांनी स्वगावी जाण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज द्या 

गडचिरोली जिल्हयात असलेल्या व आपल्या स्वगावी स्वराज्यात जाण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांनी आपली नोंदणी जवळील तहसिल कार्यालयात करावी. जेणेकरून प्रशासनाकडून सोय झाल्यास संपर्क साधता येईल.

रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यासव त्या ठिकाणाहून जिल्हयात येण्यास ईपास नाही 

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात जाण्यास व त्या ठिकाणाहून येण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ईपास साठी केलेला अर्ज नाकारण्यात येत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-04


Related Photos