कोरोना संचारबंदीत परदेशातून आलेल्या ९ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक, चंद्रपूर कारागृहात केली रवानगी


- सदर आरोपींची प्रकृती धोक्याबाहेर, गडचिरोलीकरांना न घाबरण्याचे पोलिसांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण जगात व भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तरीदेखील कझाकीस्तान व किरगीजस्तान या देशातून ९ जण गडचिरोली येथे आले. त्यामुळे त्या ९ आरोपींवर गडचिरोली पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक १२०/ २०२० कलम १४ (ब) विदेशी व्यक्ती अधिनियम १८८, २६९, २७० भादंवि कलम ३, ४, राथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम २१, महाराष्ट्र कोविड - १० अंमलबजावणी अधिनियम नियम क्रमांक ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना अटक करून चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर सर्व आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हावासियांनी या घटनेमुळे घाबरू नये, असे आवाहन गडचिरोली पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर ९ आरोपींनी ८ मार्च २०२० रोजी दिल्ली येथे भेट दिली असल्या कारणाने त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला असल्याने व संबंधित आरोपींना विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या व्हिसामधील अटी व शर्तींचे उल्लंघन केले असल्याने त्यांना आज, २९ एप्रिल २०२० रोजी गडचिरिली येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना सरकारी पंचासमक्ष आरोपींचे मोबाईल व व्हिसाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले. तपासी अंमलदार यांनी आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयास आपला पोलिस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवत आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी मागणी केली. संबंधित आरोपींनी त्यांच्या वकिलामार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. परंतु सरकारी वकील व तपासी अंमलदार यांनी न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडत आरोपींनी विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या व्हिसामधील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला व संबंधित आरोपींना न्यायालयाने १३ मे २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार तसेच मोबाईल व इतर बाबींचे तांत्रिक विश्लेषण झाल्यावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करीत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-29


Related Photos