पंजाब सरकारने दोन आठवड्यांपर्यंत वाढवला लॉकडाऊन


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड :
दुसऱ्या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी संपतोय. परंतु, त्या आधीच करोना फैलावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंजाब सरकारने लॉकडाऊन आणि कर्फ्युचा कालावधी आणखीन दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ही घोषणा केलीय. सोबतच, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना या लॉकडाऊनमधून सूट मिळेल. या चार तासांत ते घराबाहेर पडून 'सोशल डिस्टन्सिंग'चं पालन करतानाच आपल्याला आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करू शकतील, असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिला आहे. या वेळेतच दुकानंही सुरू राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली होती. अनेक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, जिथे करोना नियंत्रणात आहे अशा अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यावर जोर दिला होता. अशा वेळी पंजाबचे मुख्यमंत्री यांनी ३ मे अगोदरच हा लॉकडाऊन दोन आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. ठराविक वेळेत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीकरता सरकारी दुकानंही उघडली जातील, असंही पंजाब सरकारनं स्पष्ट केलंय. परंतु घराबाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी नागरिकांवर सोपवली आहे.
  Print


News - World | Posted : 2020-04-29


Related Photos