लॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या ४० वर्षीय महिलेवर बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जयपूर :
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. देशातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे लॉकडाउन वाढवलं जाण्याचीही शक्यता आहे. या लॉकडाउनचा देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असलेला मजूर वर्ग काम-धंद्यासाठी दुसऱ्या राज्यात अडकलेला आहे. लॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या ४० वर्षीय महिलेवर राजस्थानमध्ये बलात्कार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून सदर महिला जयपूर शहरात अडकून पडलेली होती. रस्त्यावर फिरत असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी तिची चौकशी करत तिची जवळील शाळेत राहण्याची सोय केली.
सवाई माधवपूर जिल्ह्यातील शाळेत २३ ते २४ एप्रिल या कालावधीत पीडित महिलेवर तिघांनी बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी कमल खरवाल, लखन रायगर आणि ऋषिकेश मीना यांना अटक केली आहे. याचसोबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली असून अहवाल येणं बाकी असल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलाला भेटण्यासाठी दौसा कारागृहात गेली होती. महिलेच्या मुलावर अल्पवयीन मुलीवर बलात्काचारा आरोप आहे. लॉकडाउन झाल्यानंतर जवळपास एक महिला ही महिला सवाई माधवपूरमध्ये अडकून पडली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे पीडित महिलेवरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल होता, मात्र मार्च २०१९ मध्ये तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान मुलाला भेटून झाल्यानंतर ही महिला लॉकडाउनमध्ये अडकल्यामुळे तिच्या राहण्याची सोय जवळील शाळेत करण्यात आली. याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला. दरम्यान वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर महिलेची रवानगी स्थानिक क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-26


Related Photos