विदर्भातील गृह विलगिकरणाची पहिली केस वर्धामध्ये तरीही वर्धा जिल्ह्याने कोरोनाला कसं रोखलं?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / वर्धा :
  जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने राज्यालाही सोडलं नाही. अनेक जिल्ह्यात या विषाणूने माणसाशी युद्ध सुरू केले असताना वर्धा मात्र कोरोनापासून मुक्त असणाऱ्या मोजक्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे. कधी कठोर भूमिका घेऊन, कधी नागरिकांना समजावून सांगत नाविन्यपूर्ण प्रयोगासोबतच जिल्हा प्रशासनाने राबवलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि नागरिकांचे सहकार्य याच्या भरोशावर चीनहून फेब्रुवारीतच १३ विद्यार्थी आल्यानंतरही  जिल्ह्याने कोरोनाला एंट्रीच करू दिली नाही.
चीनमधील वुहान या शहरातून कोरोनाचा पहिला आऊट ब्रेक झाला. त्याच चीनमधील बीजिंग येथून १३ विद्यार्थिनी फेब्रुवारी महिन्यात २ तारखेला वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात पोहचल्या. विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला माहिती देताच त्यांना त्यांच्या वसतीगृहातच विलगिकरण करण्यात आले.  प्रशासनाने त्यांच्यावर बारिक नजर ठेवून त्यांचा १४ दिवसांचा विलगिकरनाच्या कालावधीत त्यांना बाहेर पडू दिले नाही. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आणि त्याचवेळी परदेशातून येणाऱ्या व्यक्तींनी स्वत:हून प्रशासनाला माहिती देणारी पहिली बातमीही काढली.
प्रशासनाकडे परदेश प्रवास करणाऱ्या नागरिकांची माहिती येत गेली आणि आरोग्य यंत्रणा त्यांना गृह विलगिकरणात ठेवत गेली.  थोडेही लक्षण जाणवली की त्यांना आयसोलेशन मध्ये ठेऊन त्यांचे स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठवले गेले. गृह विलगिकरणाच नियम मोडणाऱ्या काही नागरिकांची दुकानेही प्रशासनाने सील केली. अशाप्रकारची राज्यातील सुद्धा ही पहिली कारवाई होती.
आतापर्यंत परदेशातून ११४ नागरिक जिल्ह्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यादेखील करण्यात आल्या. धडपडणाऱ्या आरोग्य यंत्रणेमधील डॉक्टर ते आशा वर्कर यांनी केलेलं सर्वेक्षणामुळे मुंबई – पुणे आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या १७ हजार ७०० नागरिकांना शोधून काढले. त्यांना होम क्वारंटाईन सोबतच त्यांच्या घरावर सुद्धा ‘होम अंडर कवारंटीन’चे स्टिकर लावले. त्यापैकी १५ हजार ७६९  लोकांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला असून १६५८  नागरिकांवर अजूनही आरोग्य प्रशासन घरी पाळत ठेवून आहे. आतापर्यंत १८१ संशयित रुग्णांपैकी १७४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लहान जिल्हा असतानाही वर्ध्यात सर्वात आधी कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या कोरोना बाधित जिल्ह्यातील लोकांना जिल्हा प्रवेशास सक्त बंदी करण्यात आली. याशिवाय या जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, फळे, मासे व मांस यावर प्रतिबंध घालण्यात आला. जिल्ह्यातला भाजीपाला जिल्ह्यातच उपयोगात आणला जात आहे. याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रवेशद्वारावरच  निर्जंतुकीकरण करण्याचा अभिनव प्रयोगही जिल्ह्यात राबवला गेला.
अगदीच घरात न करमणाऱ्या तिशीतील युवकाना व मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या साठीतील वृद्धांना ड्रोनच्या साहाय्याने टिपून त्यांनाही रोखण्यात आलं. मजुरांचे लोंढे थांबवून त्यांनाही सुरक्षा दिली. जेवण, निवाऱ्यासोबतच त्यांचे मनोरंजन, शारीरिक स्वास्थासाठी योगा, मानसिक संतुलनासाठी समुपदेशन आणि आरोग्य तपासणी अशा सर्वच सुविधा देण्यावर भर दिला. मदतीसाठी अनेक हात समोर आलेत. घेणाऱ्यांची झोळी लहान पडावी असा अनुभव प्रशासनासोबतच परप्रांतियांनी अनुभवला.
सोशल डिस्टन्सिंग पाळत येथील जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाला सुरुवात झाली. गर्दी होणारा भाजीबाजार मोकळ्या मैदानात दोन ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेणाराही वर्धा जिल्हा पहिला ठरला. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार यांनी स्वत:हून दुकानासमोर तीन फुट अंतरावर चौकोन आखून शारीरिक अंतर राखले जाईल याची काळजी घेतली. दुकानासमोर हात धुण्याची व्यवस्थाही केली.  प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाला नागरिकांनी साथ दिली.
समजावूनही काहींनी ऐकले नाही तेव्हा प्रशासनाला कायद्याची भाषा वापरावी लागली. चोरून दुकान उघडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला. अखेर धकडपटशाही, दंडुका आणि विनंत्या करून लॉकडाऊन, संचारबंदी सारखे उपाय यशस्वी ठरले आहेत. याकाळात जिल्ह्यात ४०२ वाहने जप्त करण्यात आली, १७५ गुन्हे दाखल झालेत तर १६ लाख ३१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
असे एक ना अनेक उपायांनी वर्ध्याने कोरोनाला दूर ठेवलं आहे. ३२ दिवसाच्या या संघर्षात पोलीस, महसूल, आरोग्य विभागाला नागरिकांनी साथ दिल्याने हे शक्य झालं आहे.

कोरोनासाठी तीन रुग्णालय सज्ज

कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुग्णालय सोबतच सावंगी येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि या तीन मोठ्या रुग्णालयासोबतच दोन उपजिल्हा रुग्णालये सुद्धा कोरोनासाठी सज्ज आहे.  कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे  कोविडच्या पॉझेटिव्ह  रुग्णासाठी स्वतंत्र  १०० बेडची व्यवस्था  आहे तर वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून ५० डॉक्टर तर ११० नर्स सध्या कार्यरत आहेत. इतर डॉक्टर आणि नर्स यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू आहे. तसेच जिल्ह्यात मास्क,सॅनिटायझर्स व  पीपीई  किट पुरेशा  उपलब्ध आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या बाजूच्या नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने वर्ध्याच्या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या चेकपोस्टवर १० आरोग्य पथकांमार्फत जीवनाश्यक वस्तूच्या गाडीच्या ड्रायवर आणि सहाय्यकाची  आरोग्य तपासणी सोबतच जिल्ह्यातील भाजी विक्रेत्यांची सुद्धा आरोग्य तपासणी करून ताप खोकल्याच्या रुग्णांना योग्य उपचार देण्यात आले. 
जिल्ह्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे. मात्र ज्या नागरिकांकडून आदेशाचे उल्लंघन केलं जात आहे, त्यांच्याकरिता कठोर पावले सुद्धा उचलली जात आहेत.

- मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा
  Print


News - Wardha | Posted : 2020-04-24


Related Photos