गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय पुढीलवर्षी सुरू करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार


- राज्यस्तरावरील समिती सदस्य व जिल्हा टीमबरोबरच्या चर्चेनंतर दिल्या प्रशासनाला सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज, २१ एप्रिल २०२० रोजी गडचिरोली येथे आढावा सभा घेतली. राज्यस्तरावरील समिती व जिल्हा टीमबरोबर झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय महाविद्यालय पुढीलवर्षी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली यांच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरिता आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध असून याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर डॉ. एस.एस. मोरे, प्राध्यापक डॉ. राजेंद्र सुरपाम, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असून यामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये, अशा सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या. फेब्रुवारी महिन्यात डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने निरीक्षण करण्यात आले होते व त्याचा सकारात्मक प्रस्ताव संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना फेब्रुवारी २०२० ला पाठविण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने त्याबाबतचा अहवाल आज, २१ एप्रिल २०२० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे सुक्ष्मजीवशास्त्र प्राध्यापक डॉ. राजेंद्र सुरपाम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी काहीही अडचण सद्य:स्थितीत नाही. नवीन पदनिर्मिती करुन व प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय २०२१ पर्यंत सुरू होऊ शकते. त्याकरिता आवश्यक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. तसेच याबाबत पाठपुरावा करुन कामात अडचण आल्यास कळविण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिल्या.
प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली आवश्यकता व उपलब्धता
जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक २५ एकर जागेनुसार ३२ एकर जागा उपलब्ध असून त्यामध्ये काही अडचण नाही. बाहयरूग्ण सेवा, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग तसेच इतर विभागासह २ व्याख्यान कक्षांची आवश्यकता आहे. पैकी व्याख्यान कक्ष इमारतीचे बांधकाम करावे लागेल. खाटांची आवश्यकता ३०० असून सद्या ४०६ उपलब्धता आहे. विद्यार्थ्यांसाठी ६० क्षमतेचे वसतिगृह आवश्क असून तेही उपलब्ध आहे. महाविद्यालयासाठी एकुण शैक्षणिक कामाकरिता १०३ मनुष्यबळ आवश्यक असून त्याची पदनिर्मिती अथवा प्रतिनियुक्ती करावी लागणार आहे.
विद्युत विभागाचाही पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
तसेच यावेळी विद्युत विभागाची आढावा सभा घेण्यात आली. पावसाळयापूर्वी संपूर्ण कृषी पंपा संबंधित कामे पूर्ण करण्यात यावी. पंपांची लाईन दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना पावसाळयात त्रास होणार नाही. तसेच कृषी पंपाचा बॅकलॉग पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज स्विकारण्यात येऊन विहित मुदतीत कामे पुर्ण झाली पाहिजेत, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  कंत्राटदारांना कामे दिल्यानंतर त्यांनी विहित मुदतीत कामे पुर्ण केली नाही तर त्यांच्यावर दंड आकारावा. पावसाळयापूर्वी वाढीव पोल लाईनचे कामे पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. विद्युत पोल हे जंगलातून जात असल्यामुळे पावसाळयात विद्युत खंडीत होण्याचे प्रमाणे जास्त राहते त्याकरिता आतापासून तयारीला लागून विद्युत तारेला स्पर्श करणाऱ्या फांद्या छाटायला सुरु करण्यात यावे. आता नवीन टेक्नॉलॉजीचे पाईप येत असून त्या तुटत-फुटत नाही त्या लावण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गडचिरोली वीज विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-21


Related Photos