राष्ट्रीय महामार्गाचे कामे अतिशय वेगाने सुरू करावी अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई करावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विनाकारण अपघात होत आहे. २० एप्रिल नंतर रस्ते व पुलाच्या बांधकामाची सर्व कामे अतिशय वेगाने सुरू करावी आणि महामार्ग विनाअडथळा वाहतुकीसाठी मोकळा करावा, अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
करोना संसर्ग व त्याबाबत लागू केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने नवनियुक्त पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड तथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शासनाची भूमिका टाळेबंदी करून जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरिता आहे, याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. यावेळी आरोग्य सुविधा, स्थलांतरित लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील याकरिता नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले. शेतीविषयक कामांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडून बंधने नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामे करावीत. मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. याबाबत नागरिकांनी चिंता न करता प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून खरेदी करा. घराबाहेर पडून गर्दी करू नका. जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी संचारबंदी योग्य प्रकारे राबवू या असे त्यांनी सांगितले. शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशन धान्य पावसाळय़ाआधी पोहचवण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात यावा असे त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक यांना सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-18


Related Photos