१११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थांबली वडसावरुन प्रवासी रेल्वेची ये-जा


- १९०८ ला पहिल्यांदा धावली होती वडसावरुन गोंदिया-नागभिड रेल्वे, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन

- जिल्ह्यात केवळ १८.४८ कि.मी. लांबीचे रेल्वेमार्ग, देसाईगंज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
स्वातंत्र्यपूर्व  कालखंडात इंग्रजानी माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठी सुरु केलेली पूर्वीच्या चांदा जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथून जाणारी गोंदिया -चांदा फोर्ट (आता बल्लारशा) रेल्वे सेवा आताच्या गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व रेल्वे बंद ठेवण्याच्या केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयाने वडसा (देसाईगंज ) येथून होणारी प्रवासी रेल्वेची ये-जा थांबली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज )हे महत्वाचे ठिकाण असून येथिल भाजीपाला बाजार ,धान्य बाजार ,कपडा बाजार  जिल्ह्यात प्रसिध्द आहे. जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थान असलेले ठिकाण आहे.गडचिरोली जिल्ह्याला केवळ १८.४८ कि.मी. लांबीचा लोहमार्ग लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी मालवाहतुक व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने  १९०८ मध्ये वडसा (देसाईगंज) वरुन जाणारी गोंदिया - नागभिड रेल्वेसेवा सुरु केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया -चांदा फोर्ट रेल्वे सेवा सुरु झाली. १९९२ मध्ये गोंदिया -चांदा फोर्ट रेल्वेसेवेचे रुपांतर ब्राडगेजमध्ये झाले. तत्कालीन चांदा जिल्ह्याचे कलेक्टर सी. सी. देसाई यांनी ही रेल्वे आणण्यात महत्वाचे योगदान दिले होते. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या देसाईगंज रेल्वे स्टेशनवरुन आजपर्यंतच्या १११ वर्षाच्या इतिहासात कधीही प्रवासी रेल्वेची ये-जा या रेल्वे स्थानावरुन थांबली नाही. केवळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रसरकारने  घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्यांदाच १११ वर्षाच्या जिल्ह्यातील रेल्वेच्या इतिहासात वडसा (देसाईगंज) येथून धावणारी प्रवासी रेल्वे थांबली. त्यामुळे देसाईगंज रेल्वेस्थानकावर असलेली गर्दी पूर्णपणे थांबली असून रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-13


Related Photos