महत्वाच्या बातम्या

 विकासकामांना गती देण्यासाठी उपविभागीय चालना समिती अभियान


-  तालुकास्तरावर उपविभागीय चालना बैठक
- जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार
- अधिकाऱ्यांकडून विकासकामांना सामुहिक भेट
- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांना गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपविभागीय चालना समिती हे अनोखे अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख अधिकारी तालुकास्तरावर जाऊन कामांचा आढावा घेतील सोबतच ग्रामीण भागात सामुहिकपणे कामांची पाहणी देखील करतील.
ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये गतिमानता आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रियस्तरावर भेटी देणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यास कामांना गतीमानता येते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपविभागीय चालना समिती स्थापन केली आहे. ही समिती प्रत्येक बुधवारी जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये चक्राकार पध्दतीने पंचायत समिती स्तरावर उपस्थित राहून पंचायत समितीतील विविध विभागांचा सकाळच्या सत्रात विभागनिहाय आढावा बैठक घेतील.
समितीतील अधिकारी दुपारच्या सत्रात सामुहिकपणे त्या तालुक्यातील विविध गावांना भेटी देतील. या भेटीत तेथे सुरु असलेल्या विकास कामांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतील. बैठक व भेटीदरम्यान समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सुचनांची पुर्तता झाली किंवा नाही याची देखील खातरजमा केली जाणार आहे. पुढील बैठकीत त्या त्या पंचायत समितीला अनुपालन सादर करावे लागणार आहे. जिपचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याने पंचायत समितीस्तरावर प्रलंबित सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निराकरण देखील जलदगतीने होणार आहे.
पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये मिशन ग्रामोदय, ग्रामपंचायत विकास आराखडा, वित्त आयोग व सेसफंड खर्च, रोहयो, घरटॅक्स व पाणीपट्टी वसुली, वनहक्क दावे, स्वच्छ भारत मिशन, घरकुल, जिल्हा वार्षिक योजना खर्च, पुर्ण व अपुर्ण बांधकाम, जल जीवन मिशन, शाळा, अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, सिंचन विहीर, शिक्षण, बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषि, समाजकल्याण, लघु सिंचन आदी विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना, जीवनोन्नती अभियान आदींचा आढावा घेतला जातील.

विकासकामे गुणवत्तापुर्ण व कालमर्यादेत होतील : रोहन घुगे
जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख वेळोवेळी क्षेत्रीय भेटी व आढावा बैठक घेतात. यामध्ये सुसुत्रता आणणे आवश्यक होते. एकाच वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखांनी क्रमबध्द व नियोजित वेळी बैठका व क्षेत्रीय भेटी केल्यास विकास कामात गतिमानता येईल. शासकीय योजनांचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी देखील मदत होईल. क्षेत्रीय भेटीच्या माध्यमातून विकास कामे गुणवत्तापुर्ण व कालमर्यादेत होतील. नागरिकांच्या तक्रारी व समस्या क्षेत्रीयस्तरावरच निकाली काढणे शक्य होईल. यामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही.
उपविभागीय चालना समितीची पहिली बैठक आज पंचायत समिती, आष्टी येथे पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.ज्ञानदा फणसे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंचायत समिती आष्टी व आर्वीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली तसेच गावकऱ्यांशी संवाद देखील साधला.





  Print






News - Wardha




Related Photos