पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी गोळ्या घालून केली इसमाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोहका-मोकासा गावाजवळ आज नक्षल्यांनी गोळ्या घालून इसमाची हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमार घडली. जिवता गणपत रामटेके (४५) रा.कोटगूल असे मृत इसमाचे नाव आहे. सदर इसम हा पत्नीसह शेतशिवारात मोहफुले वेचण्यास गेला होता. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी सदर इसमाची हत्या केली अशी माहिती मिळत आहे .
प्राप्त माहितीनुसार कोटगुल येथील जिवता रामटेके हा पत्नी सोबत आज पहाटे कोहका-मोकासा येथील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान तेथे एक नक्षल महिला मोहफुले वेचत होती. तिने जिवता रामटेके याच्या पत्नीला तिच्या पतीचे नाव विचारले. काही क्षणातच दोन नक्षलवादी तेथे आले. व त्यांनी नीलमला पकडून ठेवले . दुसऱ्या नक्षल्यांनी जिवताला काही अंतरावर नेले व गोळ्या घालून त्याची हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णवाहिका घटनास्थळी नेली व जिवताला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तेथे त्याचा उपचार न झाल्याने त्याला  कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच जिवता रामटेके याची प्राणज्योत मावळली.
जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मनिषा नामक मुलीचे लग्न होणार होते. यामुळे रामटेके कुटुंबावर शोककळा पसरली होती. घटनेचा अधिक तपास कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलिस मदत केंद्राचे अधिकारी राऊत करीत आहेत. या घटनेमुळे कोरची तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-08


Related Photos