आलापल्लीत आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण, सदर व्यक्ती अकोला येथील असल्याची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असतानाच अहेरी तालुक्यातील आलापल्ली नागेपल्ली येथील सेवासदन हाॅस्पिटलमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर व्यक्ती मूळचा अकोला येथील असून तो १८ मार्चपासून या परिसरात राहत असून वनविभागात कार्यरत आहे. त्याला मागील काही दिवसांपासून कोरडा खोकला असल्याने त्याला गडचिरोली येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूंचा गडचिरोली जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेतल्या जात आहे. या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. बाहेर जिल्ह्यात व राज्यातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवल्या जात आहे. असे असतानाच आलापल्ली नागेपल्ली येथील सेवासदन हाॅस्पिटलमध्ये एक कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हावासियांनी विशेष खबरदारी घेउन अनावश्यक घराबाहेर पडू नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-06


Related Photos