औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी : ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / औरंगाबाद :
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने आता आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवला आहे. मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. औरंगाबादेत ५५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीवर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते . मात्र आता त्याचा मृत्यू झाला आहे. हा कोरोनाचा मराठवाड्यातील पहिला बळी आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाने मराठवाड्यातही डोकं वर काढलं असून नागरिकांमध्ये काहीसं चितेंचं वातावरण तयार झालं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचे आणखी ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. यामध्ये एका ७ वर्षीय कोरोनाबाधित मुलीचाही समावेश आहे. मिनी घाटीमध्ये ४ , मुख्य घाटीमध्ये १ तर एका खाजगी रुग्णालयात १ जण उपचार घेत आहे. कोरोनाची लागण झालेल्या इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos