नागरी परिसरात ३ लाख रुपयांची हातभट्टी दारू जप्त, आरोपी फरार, वरोरा पोलिसांची कारवाई


- संचारबंदी व कोरोना महामारीतही वरोरा तालुक्यात दारूचा महापूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
पोलिस स्टेशन वरोरा अंतर्गत येणाऱ्या नागरी परिसरातील शेतात हातभट्टीवर दारू काढत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली असता आज, ४ एप्रिल २०२० रोजी सकाळी दोन ठिकाणी धाड टाकून ३ लाख रुपये किंमतीची हातभट्टी दारू जप्त केली आहे. यावेळी घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून त्यांच्याविरुद्ध वरोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या जिल्ह्यातही सुद्धा संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या संचारबंदीच्या काळात सुद्धा वरोरा तालुक्यात दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र या घटनेवरून दिसून येत आहे.
वरोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी देशमुख यांना वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागरी शिवारातील शेतात हातभट्टीवर मोहाची दारू काढत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी आपल्या ताफयासह आज, ४ एप्रिल रोजी सकाळी त्या ठिकाणी धाड टाकली असता नदीच्या काठावर वेगवेगळ्या रंगाच्या ९ प्लाॅस्टिक ड्रममध्ये १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा जप्त केला. तसेच नागरी येथील शंकर शिवरकर यांच्या शेतात १० प्लाॅस्टिक ड्रममध्ये १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शंकर शिवरकर (३८), विजय दिवाकर नैताम (३५), दिनेश मारोती बोरकर (३२), दिगांबर आत्राम (४५), सर्व रा. नागरी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ब), (ह), (ई) तसेच संचारबंदी कलम १८८ अन्वये वरोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सदर कारवाई वरोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी देशमुख, पोलिस कर्मचारी नितीन, प्रवीण, शेखर यांनी केली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-04


Related Photos