गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिल्लक असलेले शालेय पोषण आहाराचे धान्य होणार वाटप


- विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. या महामारीच्या संकटामुळे देश व राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच शाळांना मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुट्टया देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा साठा शिल्लक आहे. हा साठा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना वाटप होणार असून संबंधित शाळेच्या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मार्फतीने कळविण्यात आले आहे. या शालेय पोषण आहारातील धान्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.
जगात, देशात व महाराष्ट्रात सुद्धा कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शासन व प्रशासनाच्यावतीने सर्वच शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यात आले नसल्याने या आहारातील धान्य साठा शिल्लक आहे. हे धान्य खराब होऊ नये याकरिता ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य शिल्लक आहे त्या शाळेतील शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांना त्या त्या प्रमाणात धान्याचे वाटप करण्यात यावे, असा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनामार्फत घेण्यात आला असून जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना कळविण्यात आले आहे. सुट्याच्या काळात शालेय पोषण आहार शाळांमध्ये शिजविण्यात आला नाही. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये हे धान्य शिल्लक आहे. हा साठा अधिक काळ तसाच पडून राहिल्यास खराब होईल व ते फेकावे लागेल या उद्देशाने गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने शिल्लक असलेला शालेय पोषण आहारातील धान्य साठा त्या त्या शाळेतील शिक्षकांनी गर्दी न करता संबंधित विद्यार्थ्यांना त्या त्या प्रमाणात वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारातील धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-02


Related Photos