तब्लिग जमातचा एक व्यक्ती आढळला राजुऱ्यात, नमुना तपासणी अहवालाची सर्वांना प्रतीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
नवी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या लागणमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमातून परतलेला एक व्यक्ती राजुरा शहरात सापडला आहे. त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या नमुन्याचा अहवाल काय येते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ असून प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या कोरोना तपासणीच्या अहवालाची सर्वांना प्रतीक्षा असून अहवाल गुरुवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. तरीही हे इतर बाहेरून आलेल्या प्रवाश्याना होम क्वॉरंटाइन केल्यासारखेच असून नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही असे नाव न लिहिण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने कळविले आहे.
निजामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’ ‘कोरोना’चा हॉटस्पॉट कसा ठरला?
दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात ‘तब्लिग जमात’ तर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’चं प्रसारकेंद्र झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते. ‘तब्लिग जमात’मध्ये उपस्थित राहिलेल्या भाविकांपैकी ३०३ जणांमध्ये कोरोनाची लक्षण दिसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. हे भाविक आपापल्या राज्यात परतल्यामुळे ‘कोरोना’ मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. ‘तब्लिग जमात’च्या कार्यक्रमात ५ हजार भाविक सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी २ हजार १३७ सहभागींची ओळख पटली आहे, तर इतरांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत १२०३ भाविकांच्या ‘कोरोना’ चाचण्या घेण्यात आल्या असून २४ जण ‘कोरोना’ग्रस्त असल्याचं आढळलं आहे. जे भाविक या कार्यक्रमात सहभागी होते, त्यांनी स्वत: पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. दिल्ली पोलिसांनी निजामुद्दीनमधला हा पूर्ण भाग सील केला आहे, ज्यामध्ये ‘तब्लिग जमात’च्या मुख्य केंद्राचाही समावेश आहे. निजामुद्दीनमधील मरकज प्रकरणी मौलाना साद, डॉ. झीशान, मुफ्ती शेहजाद, एम सैफी, युनूस आणि मोहम्मद सलमान यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकांना जमा करणे आणि जमावबंदीचा नियम तोडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. निजामुद्दीनमधील मरकज रिकामे करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पाच दिवसाचा वेळ लागला. आज सकाळी ४:३० च्या सुमारास सर्व मरकज रिकामे झाले आहे. २३०० पेक्षा जास्त लोकांना यामधून बाहेर काढले आहे. पूर्वपरवानगीशिवाय भाविक इथे मोठ्या प्रमाणावर जमल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
महाराष्ट्रातील किती आणि कुठले भाविक?
निझामुद्दीन परिसरातला ‘तब्लिग जमात’चा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल १३६ जण ‘तब्लिग जमात’ला गेले होते. औरंगाबादमधून ४७, तर कोल्हापुरातून २१ भाविक सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर, नांदेड, ठाणे, सातारा, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील भाविक सहभागी झाल्याचं समोर येत आहे. ‘तब्लिग जमात’ हे देशातील ‘कोरोना’चं मोठं हॉटस्पॉट असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये पाच कोरोनाग्रास्तांपैकी दोन परदेशी रुग्ण हे ‘तब्लिग जमात’चे सहभागी आहेत. तर अन्य ३ पॉझिटिव रुग्ण हे सहभागींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड – १३६, औरंगाबाद– ४७, कोल्हापूर – २१, सोलापूर – १६, मुंब्रा (ठाणे)- १४, नांदेड – १३, सातारा – ७, उस्मानाबाद – ६, चंद्रपूर – १, अहमदनगर – ३४ (२९ परदेशी नागरिक), नाशिक – १५, सांगली – ३ असे एकूण – ३१३ जणांचा समावेश आहे. याआधीच कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जम्मू काश्मीरमधील ६५ वर्षीय नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यानंतर याची पाळंमुळं समोर येऊ लागली. तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगालमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध उघड होऊ लागले.
तब्लिग जमात म्हणजे नेमकं काय?
‘तब्लिग जमात’ ही एक धार्मिक संस्था आहे. १९२० पासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची ‘मरकज’ म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरु असतो. प्रत्येक ‘इज्तेमा’चा ठराविक दिवसांचा कालावधी चालतो. ‘कोरोना संसर्ग’ झालेले रुग्ण सापडत असल्याच्या बातम्या येत असतानाही निजामुद्दीनमधील ‘मरकज’मध्ये ‘इज्तेमा’ सुरु होता. यावेळी इतर राज्यामधील भाविक ये-जा करत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात अनेक ठिकाणी अशा आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, तरी दिल्लीतील कार्यक्रम सुरुच राहिला.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-01


Related Photos