गृह विलगीकरण म्हणजे काय ?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
 कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (Quarantine ) हा शब्द सध्या वारंवार कानावर पडतो. गृह विलगिकरण म्हणजे कोरोना बाधित देशातून आलेले  भारतीय प्रवासी, परदेशी नागरिक तसेच देशातील कोरोना बाधित भागातून आलेल्या सर्वांनाच समाजापासून आणि कुटुंबियांपासून वेगळे ठेवणे होय. यांनी किती दिवस वेगळे राहायचे असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येतो. कोरोनाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा २ ते १४ दिवसांचा आहे. काहींमध्ये ही लक्षणे लवकर दिसतात तर काहींमध्ये अगदी १४ व्या, पंधराव्या दिवशी दिसायला लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींना इतरांपासून आणि कुटुंबीयांपासून १४ दिवस दूर ठेवणे आवश्यक असते. जेणे करून यांना लक्षण आढळलीच तर ते इतरांच्या संपर्कात येऊन त्यांना  बाधित करणार नाहीत. त्यासाठी त्यांनी १४ दिवसांसाठी गृहविलगिकणात राहणे आवश्यक आहे. त्यांचा संपर्क कुंटूबियासोबतच इतरांशी होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने गृहविलगीकरणातील व्यक्तीं आणि कुटुबियांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

गृह विलगीकरण कक्ष

गृहविलगीकरण कक्ष म्हणजे शौचालय व स्नानगृह जोडून असलेली घरातील वेगळी खोली. ही खोली हवेशीर आणि सुर्यप्रकाश येणारी असावी.

गृह विलगीकरणातील व्यक्तींने काय करावे ?

गृहविलगीकरणातील  व्यक्तीने अल्कोहोलयुक्त सॅनीटायझर किंवा साबण ‍आणि पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवावे. स्वत:चे वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी इत्यादी दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. पूर्णवेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर सहा ते आठ तासाने बदलावे. वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये. अशा व्यक्तीने आणि सुश्रृषा करणाऱ्या  व्यक्तीने वापरलेले मास्क ५ टक्के ब्लीच किंवा १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतु संसर्गयुक्त असतो. अशा व्यक्तीनी खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. 
गृह विलगीकरणात असलेल्या  व्यक्तीने १४ दिवस खोलीच्या बाहेर पडू नये, घरातील वृदध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये.

घरातील सदस्यांनी घ्यावयाची काळजी

शक्यतो घरातील एकाच व्यक्तीने गृहविलगीकरणातील व्यक्तीची सुश्रृषा करावी. अशा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे. विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळतांना डिस्पोजेबल ग्लोव्ह्जचा वापर करावा. त्यांचे कपडे झटकू नये. डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज काढल्यानंतर हात हॅन्डवॉशने स्वच्छ धुवावे. नातेवाईक आणि अभ्यागतांना अशा व्यक्तींना भेटू देऊ नये. विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यास घरातील त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी गृहविलगीकरणात 14 दिवस राहावे.  

विलगीकरण कक्षाची स्वच्छता

विलगीकरण कक्षातील वारंवार हातळल्या जाणा-या वस्तूंचे, (फर्नीचर, बेड, टेबल, खुर्ची ईत्यादी) निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण फिनाईलने करावी. अशा व्यक्तीचे कपडे, आंथरुन, पांघरुन  डिर्टजंटमध्ये स्वच्छ धुऊन उन्हात वाळवावे.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास गृह विलगिकरणातील व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावरही घरातील इतर कुणीही बाधित होणार नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच संसर्ग टाळण्याचा उत्तम पर्याय आहे.      
  Print


News - Bhandara | Posted : 2020-03-29


Related Photos