संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना गडचिरोली पोलिस दलाचा दणका


- वाहनांवर मोपका अंतर्गत कार्यवाही, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड केला वसूल

- संचालरबंदीचे पालन करण्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरेाना (कोविड १९)  या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असताना गडचिरोली जिल्ह्यात काही बेजबाबदार नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलिस दलाने जिल्हाभरात कार्यवाहीचा बडगा उचलला आहे. संचारबंदीच्या काळात जिल्हाभरात आजपर्यंत एकूण ३२२ वाहनांवर मोटार परिवहन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली असून ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संचारबंदीच्या काळात जनतेला जीवनावश्यक साहित्यांची अडचण भासू नये यासाठी शासनाने जीवनाश्यक साहित्यांची सेवा देणाऱ्या केंद्रांना सुट दिलेली आहे. परंतु काही बेजबाबदार नागरिक काहीही कारण नसताना शहरात फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. कोविड १९ साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या संचारबंदीचे सर्व नागरिकांनी पालन करणे आवश्यक असताना काही बेजबाबदार नागरिक अत्यावश्यक सेवेशिवाय केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी बाहेर पडणार असतील तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हाभरातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-27


Related Photos