जमाव बंदी लागू असतांनाही गर्दी केल्यास कारवाई करणार : राजेश टोपे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी हा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टंसिंग ठेवा. वाहने बाहेर आणून रस्त्यावर गर्दी करू नका, अन्यथा कारवाई करू, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. राज्यात आज पुन्हा १५ करोना रुग्ण आढळले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर गेली आहे. आज आढळलेल्या १५ रुग्णांपैकी ८ जणांना संपर्कामुळे लागण झाली आहे. ६ लोक हे बाहेर देशातून आलेले आहेत, असं सांगतानाच कम्युनिटीमध्ये हा विषाणू वाढलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी करोना विरोधात लढायचे असेल तर 'मीच आहे माझा रक्षक' हा मंत्रही नागरिकांना दिला.
मधुमेही, दमा, बीपीचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात ६ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. येत्या २७ मार्चपासून राज्यातील प्रत्येक मेडिकल कॉलेजात लॅब सेटअप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच खासगी रुग्णालयातही करोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-23


Related Photos