महत्वाच्या बातम्या

 बनावट शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखेडोबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालादेखील भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून एका शाळेच्या पदाधिकाऱ्याने चक्क विद्यार्थ्यांच्या भविष्याला खेळण्याचा प्रकार केला आहे. कुठलीही परवानगी न घेता मूळ शाळेच्या नावाशी मिळतीजुळती बनावट खासगी शाळा उघडून अगोदर विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर मुलांना मूळ शाळेचे बनावट दाखले देण्यात आले. हा गैरप्रकार समोर आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शालेय शिक्षण वर्तुळात तर खळबळ माजली आहे. शिवाय पोलिस देखील थक्क झाले आहेत.

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दवलामेटी येथे श्री साईनाथ कॉन्व्हेंट असून तेथे अमरेंद्रकुमार चंचलकडे प्रशासकीय कामाची जबाबदारी होती. संबंधित संस्थेत रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असतानाच चंचलने जुना कामठी मार्गावर शाळेच्या नावाशी मिळतीजुळती श्री साई कॉन्व्हेंट उघडली. त्यांनी याची कुठलीही माहिती शाळेच्या संस्थेला दिली नव्हती. तसेच कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी घेतली नाही. श्री साईनाथ कॉन्व्हेंटची ब्रांच असल्याचे चंचलने स्वत:च्या शाळेत मुलांचे प्रवेशदेखील करवून घेतले. परंतु शाळा जास्त काळ टिकू शकली नाही व ती बंद करावी लागली.

पालकांनी चंचलकडे टीसीसाठी तगादा लावला. चंचलने श्री साईनाथ कॉन्व्हेंट येथील क्लर्क मोहिनी बहादुरे व तत्कालीन मुख्याध्यापिका रश्मी वऱ्हाडपांडे यांच्या सहकार्याने २२ मुलांच्या बनावट टीसी तयार केले व त्या पालकांना दिले. त्यांच्यावर शाळेचा शिक्कादेखील होता. परंतु टीसीवर प्रवेश क्रमांक, टीसी क्रमांक यांची नोंद नव्हती. यासंदर्भात शाळेकडे विचारणा झाल्यावर हा गैरप्रकार उघडकीस आला. शाळे अंतर्गत चौकशीनंतर चंचलला कार्यमुक्त केले. मुख्याध्यापक रवींद्र पाखरे यांनी यासंदर्भात वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चंचल, बहादुरे व वऱ्हाडपांडे यांच्याविरोधात फसवणुकीसह भादंविच्या ३४, ४६६, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos