मुंबईतील एसी लोकल उद्यापासून बंद करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बरवरील एसी लोकल देखील उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
एसी लोकलमधून प्रवास करताना कुणालाही करोनाची लागण होऊ नये, नागरिकांनी गर्दीतून प्रवास करणं टाळावं यासाठी ही सेवा बंद करण्यात येत असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं. एसी लोकल बंदिस्त असते, त्यामुळे एखाद्याच्या शिंकण्यामुळे बाहेर पडणारे जंतूंना लोकलच्या बाहेर पडण्यास वाव नसतो. त्यामुळे त्याचा कुणालाही संसर्ग होऊ शकतो. शिवाय एसी लोकलचं तापमान अत्यंत कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एसी लोकल बंद करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं. एसी लोकल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी प्रवाशांच्या हितासाठीच हा रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी, ठाणे-नेरूळ आणि ठाणे-पनवेल दरम्यान एकूण १६ एसी लोकल धावतात. या सर्व एसी लोकलही उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-19


Related Photos