महत्वाच्या बातम्या

 पती क्रूरपणे वागला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे : सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 39 वर्षीय आरोपी पतीची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. केवळ पती पत्नीसोबत क्रूरपणे वागला म्हणून त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही.

हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृतींचे ठोस पुरावे असणे आवश्यकच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला आहे.

मुलुंड येथील आरोपी नरेश चावडा याला पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जून 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्याने दारूच्या नशेत पत्नीचा छळ केला. त्याच्या याच त्रासाला पंटाळून पत्नी ममता हिने आत्महत्या केली, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र आरोपीच्या क्रूर वागण्यासंबंधी कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पुरावे सादर केले नाहीत. सरकारी पक्षाच्या या अपयशावर बोट ठेवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी आरोपीची निर्दोष सुटका केली.

आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी केवळ त्याचे पत्नीशी क्रूरपणे वागणे पुरेसे नाही. त्याने पत्नीला स्वतःचा जीव संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे आरोपीला दोषी ठरवता येणार नाही, असे मत नोंदवत न्यायाधीशांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात भादंवि कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा ठरविणाऱ्या घटकांचा उल्लेख केला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos