जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दीवर निर्बंध : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


- साथरोग अधिनियमांतर्गत जिल्हयात विविध आदेश जारी

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यात १३  मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे, याच धर्तीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी वेगवेगळे आदेश दिलेले आहेत. यामध्ये २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येवून गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, हॉटेल व लॉजवरील मालकांनी येणा-या बाहेरील व्यक्तींची माहिती प्रशासनाला दररोज द्यावी, ३१ मार्च पर्यंत जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण अंगणवाडी/शाळा/महाविद्यालये बंद राहतील, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाटयगृहे, उद्याने इ. सार्वजनिक ठिकाणे पुढिल आदेश येईपर्यंत बंद राहतील, लोकबिरादारीसह हेमलकसा व अन्य जिल्हयातील पर्यटन ठिकाणेही बंद राहतील, स्वागत समारंभ, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत, मंडई भरवता येणार नाही. लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा प्रसार होईल असे कोणतेही कृत्य आता करता येणार नाही. आणि प्रत्यक्ष अथवा सोशल मिडीयावर अफवा पसरविणा-यांवर प्रतिबंद करण्यात येत आहे. अशा प्रकारे विविध आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज निर्गमित केले आहेत.
प्रशासनाकडून जनतेसाठी व जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेवून करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे नागरीक म्हणून आपण जागरूकता दाखवून या संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचा आदर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच सर्व राजकीय कार्यक्रम व धार्मिक ठिकाणची गर्दी तसेच कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे. यानूसार जिल्हयातही सर्व स्तरावर लोक एकत्रित येतील असे कार्यक्रम घेवू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
करोना विषाणू संसर्गाबाबत विशेषकरून वय वर्षे पन्नास वरील व आजारी वयस्क यांनी काळजी घेणेची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. या वयातील व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब असे आजार असल्यास त्यांना करोना संसर्गापासून दूर राहणेसाठी प्रतिबंधात्मक काळजी जास्त घेणे गरजेचे आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला खोकला, सर्दी व तापाची लक्षणे एकत्रित जाणवत असतील तर घाबरून न जाता स्व:ता आयसोलेशनमध्ये रहावे. तसेच घरातील इतर व्यक्ती अथवा बाहेरील व्यक्तींशी जवळून संपर्क ठेवू नये. वेळीच जवळच्या दवाखान्यात तज्ञ डॉक्टरांना भेटून तपासणी करावी. आजारी व करोना लक्षणे दिसून आल्यास स्व:ताहून इतरांपासून दूर राहणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. 
समाजात आज करोना रूग्ण म्हणजे गुन्हेगार किंवा तो वेगळा अशी वागणूक दिली जात आहे. यामुळे करोना रुग्ण तपासणी करण्यास किंवा समोर येण्यास टाळाटाळ करत आहेत. यातून संसर्ग जास्त प्रमाणात होण्यास वाव मिळतो आहे. त्यामुळे इतरांनी करोना संसर्गाबाबत कोणालाही लक्षणे आढळल्यास त्याचे खच्चीकरण न करता त्याला प्रोत्साहीत करून तपासणी करण्याचा सल्ला द्यावा. यातून स्व:पुढकाराने लोक समोर येवून उपचार घेतील, आयसोलेशन वार्ड मध्ये थांबतील. यामुळे निश्चितच करोना संसर्गापासून आपणाला दूर राहता येईल.

डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी : जिल्हयात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याच प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. जिल्हयातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी रूग्णांना तपासणीवेळी करोना लक्षणे आढळून येतात का हे पडताळून पाहण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. करोना संसर्ग तपासणीत त्या पध्दतीची लक्षणे आढळून आल्यास यंत्रणा तपासणीसाठी पावले उचलत आहे. लोकांना करोनाबाबत अचूक माहिती देणे व जनजागृती करणेकरीता आरोग्य विभागाबरोबरच प्रशासनातील प्रत्येक विभाग कार्य करीत आहे. लोकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सहकार्य करावे ही विनंती.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-16


Related Photos