नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना आले यश


- भूसुरुंग स्फोटके जागीच केली निकाली, मोठा नक्षल साहित्य केले हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
हेडरी उपविभागांतर्गत येणाऱ्या हेडरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लावलेले भूसुरुंग स्फोटके पोलिस जवानांनी निकामी करत नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा कट उधळून लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्या गेला आहे. हेडरी उपविभागांतर्गत येणारया हेडरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात १५ मार्च २०२० रोजी हेडरी पोलिस मदत केंद्रातील पोलिस व सीआरपीएफ बटालियन १९१ कंपनी सी. चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी जनानांना जिवे मारण्याच्या उद्देशाने भूसुरुंग स्फोट घडवून आणत जवानांच्या दिशेने गोळीबार केला. बहादूर जवानांनी नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर नक्षलवाद्यांनी आणखी एक भूसुरुंग पेरून ठेवल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. समयसूचकता दाखवत पोलिस जवानांनी सदर भूसुरुंग स्फोट घटनास्थळावरच निकामी केला. त्याचबरोबर जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. जवानांनी नक्षलविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात यश मिळविले आहे. पोलिस मदत केंद्र हेडरी व सीआरपीएफ १९१ बटालियनच्या जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतूक केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-16


Related Photos