पोलिस संरक्षणाविना गडचिरोलीचे महिला व बाल रुग्णालय


- रुग्णालयात भरती असलेल्या बालक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जिल्हा महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील व राज्यातील शेकडो माता व बाल रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचाराकरिता भरती सुद्धा होतात. मात्र या रुग्णालयाला सध्या पोलिस संरक्षण नसल्याची माहिती आहे. रुग्णालय स्थापन करण्यात आल्यानंतर रुग्णांच्या सुरक्षेसाठी व साहित्याच्या देखरेखीसाठी एका पोलिस कर्मचारयाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून या रुग्णालयात कोणत्याही पोलिस कर्मचारयाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने पोलिस संरक्षणाविनाच हे रुग्णालय सुरू आहे. त्यामुळे या रुग्णालयात भरती असलेल्या बालक व महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील महिला व बाल रुग्णालय गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिला व बालकांच्या उपचाराकरिता विविध सोयी सुविधा व अत्याधुनिक उपकरणे, यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना सेवा देखील चांगल्याप्रकारे मिळत आहे. या रुग्णालयात बलात्काराच्या घटनांमधील पीडित महिला, युवती आणि प्रसुतीकरिता महिला भरती होत असतात. तसेच गर्भवती महिला व आजारी बालकांना सुद्धा तपासणी व औषधोपचारासाठी आणल्या जातात आणि वेळप्रसंगी भरती सुद्धा करण्यात येत असते. त्यामुळे या रुग्णालयाला पोलिस संरक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या रुग्णालयात पोलिस कर्मचारी नियुक्त नसल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयात काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हावासियांकडून जोर धरत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-15


Related Photos