कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी सिंगला यांचे आदेश निर्गमित


- सिरोंचा येथील उर्स जत्रा व कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्याचे प्रशासनाचे आवाहन, उर्स समितीने घेतली सहकार्याची भूमिका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सिरोंचा येथे होऊ घातलेल्या हजरत वली हैदरशाह रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रा व कव्वालीचा कार्यक्रम रद्द करणेबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रशासन व संबंधित समिती व येणाऱ्या भाविकांना कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. याला प्रतिसाद देत उर्स समितीने सदर उर्स जत्रेत लोकांची गर्दी कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये तहसीलदार सिरोंचा यांनी १२ मार्च २०२० ते १४ मार्च २०२० दरम्यान सिरोंचा येथे होऊ घातलेला हजरत वली हैदरशाह रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रा व रात्री कव्वालीचा कार्यक्रम मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमेटी सिरोंचाचे अध्यक्ष यांनी आयोजित केला असल्याचे कळविले. कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमिवर युनिसेफ, केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे धार्मिक बाबी वगळता अन्य कार्यक्रमास, संसर्गाचा धोका टळेपर्यंत स्थगिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उर्स आयोजक कमेटीने सर्वसंमतीने याबाबत प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
उर्स यात्रेत उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी आवश्यक धार्मिक बाबी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही. यात्रा, दुकाने, आकाश पाळणे लावता येणार नाही. स्वागत समारंभ, कव्वाली, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. कोरोना व्हायरसचा (nCov) संसर्ग होणार नाही याची मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमेटी अध्यक्ष सिरोंचा यांनी खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश गडचिरोलीचे जिल्हादंडाधिकारी दीपक सिंगला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर ठिकाणी व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे उर्सकरिता येणाऱ्या भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामध्ये शेजारील तेलंगणा, छत्तीसगड राज्य तसेच महाराष्ट्रातील जवळील सर्व जिल्हे येथील प्रशासनालाही आवाहन करण्यात येत आहे, की तिथून येणार्‍या भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याचे कळविण्यात यावे, असे कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-11


Related Photos