डॉ. अभय बंग यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ने गौरव


- प्रवरा येथील वैद्यकीय अभिमत विद्यापीठाने केला सन्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाद्वारे डॉ. अभय बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स(डी.एससी) सन्मान देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचा १४ वा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स(डी.एससी) ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय एम जयराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पदवीदान समारंभात ३६३ पदवी, १२० पदव्युत्तर आणि ९ पीएचडी अशा ४९२ विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात आले.
डॉ. बंग यांच्या गौरवार्थ डॉ. केळकर म्हणाले, आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग गडचिरोली जिल्ह्यात सर्च या आरोग्यसेवी संशोधन संस्थेद्वारे ३२ वर्षांपासून करत आहे. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज भारतासह अनेक देशांत राबवला जात आहे. मुक्तिपथ या पथदर्शी प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. आदिवासी आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य ‘पायोनियर’ आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन डॉ. केळकर यांनी केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-11


Related Photos