आरमोरी येथे ३० लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य जप्त


- पोलिस विभाग व अन्न औषधी प्रशासनाची संयुक्तिक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
आरमोरी पोलिस ठाण्या अंतर्गत येणारया आरमोरी शहरातील शक्तीनगरमधील रिलायन्स/ जिओ टाॅवरजवळ असलेलया सलीम माखानी यांच्या गोडाऊनवर पोलिस विभाग व अन्न औषधी प्रशासन विभागाने ६ मार्च २०२० रोजी छापा टाकून ३० लाख १७ हजार १४७ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शक्तीनगर येथील सलीम माखानी यांच्या गोडाऊनमध्ये मजा/इगल व इतर तत्सम प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती सूत्रधारांमार्फत प्राप्त झाल्याने सदरची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळविण्यात आली. तसेच अन्न औषधी प्रशासन विभाग गडचिरोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी उमाप यांना माहिती दिली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक चेतनसिंग चैहाण, पोलिस हवालदार गलबले, पोलिस नाईक नैताम, पोलिस हवालदार कोडापे, पोलिस हवालदार चिकनकर हे सदर ठिकाणी जावून छापा घातला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मजा, इगल, शिशा, हुक्का आदी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामुळे सदर ठिकाण सुरक्षित करण्यात आले. त्यानंतर ७ मार्च २०२० रोजी अन्न औषधी प्रशासन विभागाचे प्रवीण उमाप यांनी त्यांच्या पथकासोबत येवून पोलिसांच्या सहायाने सदर ठिकाणी सुरक्षित केलेला ३० लाख १७ हजार १४८ रुपये किंमती प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त मालातून परीक्षणासाठी नमुने काढण्यात आले असून त्याचा अहवाल येताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, सहायक पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व उपविभागीय पोलिस अधिकारी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-08


Related Photos