महिला दिनानिमित्त आत्मसमर्पित महिलांनी नक्षलमध्ये गेलेल्या इतर महिलांना नक्षल जीवन सोडून आत्मसमर्पणाचे केले आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षलवादी जीवनाला कंटाळून गडचिरोली पोलीसांसमोर आजपर्यंत १९४ महिला नक्षलींनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित महिलांनी आज महिला दिनानिमित्त एकत्र येत नक्षलविरोधात घोषणा देऊन महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. या महिला नक्षलींनी नक्षलवादी जीवनाची आठवण काढताच मनात धस्स झाल्याची व अंगावर शहारे आल्याची भावना व्यक्त करत या नरक जीवनाच्या आठवणी देखील नकोश्या आहेत असे सांगितले. त्याचबरोबर आपण जे भोगले ते इतर महिलांना भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण स्वतः महिला दिनाच्या माध्यमातून नक्षलमध्ये गेलेल्या इतर महिलांना नक्षल जीवन सोडून सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत असल्याचे म्हंटले.
आत्मसमर्पित झरीना हिने सांगितले की, ३ री इयत्तेत शिकत असताना २००४ साली नक्षलवादी अल्पवयीन वयात मला नक्षलमध्ये बळजबरीने घेऊन गेले.वरिष्ठ तेलगू नक्षलवादी हे स्वतःच्या फायद्यासाठी आमच्यासारख्या सामान्य आदिवासी महिलांना नक्षलमध्ये भरती करून त्यांचा वापर करून घेतात.या वरिष्ठ तेलगू नक्षलवाद्यांचा डाव लक्षात आल्यानेच मी आत्मसमर्पण केल्याचे तिने म्हटले. त्याचबरोबर महिला दिनानिमित्त इतर नक्षल महिलांनी देखील लवकरात लवकर आत्मसमर्पण करावे असे आवाहन तिने केले.
पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे सो यांनी आत्मसमर्पित महिला नक्षलींना महिला दिनाचे औचित्य साधत  इतर नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याच्या केलेल्या आवाहनाचे कौतुक केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-08


Related Photos