तेलंगणामध्ये शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या ११ विद्यार्थिनींवर केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हैदराबाद :
निर्भया प्रकरणातील फाशीच्या शिक्षेच्या विलंबामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. त्यात देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांविरोधात अत्याचाराचं प्रमाणही वाढत असल्याचं चित्र आहे. आता त्यात भर घालणारी एक घटना तेलंगणा राज्यात घडली आहे. येथील एका शाळेच्या शिक्षकाने चौथीतल्या ११  विद्यार्थिनींवर बलात्कार केला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणाच्या वानापार्थी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील एका खासगी शाळेतील १०  वर्षीय विद्यार्थिनीला रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या तपासणीदरम्यान मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे  सांगितले . तिने दिलेल्या माहितीमुळे तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी एका विद्यार्थिनीला रक्तस्रावाचा त्रास होत असल्याचं निदर्शनाला आले. तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावरही बलात्कार झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणाची चौकशी करताना तब्बल ११  विद्यार्थिनींसोबत बलात्कार झाल्याचे  उघड झाले . यातील काहींवर वर्गात तर काहींवर शाळेच्या परिसरात बलात्कार करण्यात आला होता. या सर्व जणींनी आपल्या एका शिक्षकाने हे कृत्य केल्याचे सांगितल्याने या २६  वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली. हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
  Print


News - World | Posted : 2020-03-07


Related Photos