ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करावी - अजय कंकडालवार


- पोहचपावती किंवा शपथपत्रावर अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /गडचिरोली :
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करून जातवैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीस सादर केलेल्या पोचपावती किंवा १०० रुपयांच्या शपथपत्रावर उमेदवारी अर्ज सादर करता येण्यासाठी उचित आदेश देण्यात यावे, अशी मागणी गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांना आज, ६ मार्च २०२० रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात पडताळणी समित्यांकडील कार्य तसेच निवडणुकींसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज यामुळे नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. जात पडताळणी समित्यांवर वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कामाचा अधिक भार असल्यामुळे तसेच जिल्ह्यातील जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित असल्याने जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करता येत नाही. त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जात पडताळणी समितीस सादर केलेल्या पोहचपावती किंवा १०० रुपयांच्या शपथपत्रावर अर्ज सादर करता यावे याबाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-06


Related Photos