वऱ्हाडी बनून रेती घाटावर पोलिसांचा छापा : १२ टिप्पर, ८ जेसीबी केल्या जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
लग्नाचे  वऱ्हाड थेट वाळू घाटावर पोहोचून अवैधरीत्या सुरु असलेल्या वाळू घाटावर मोठी कार्यवाही केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात आज शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली आहे. या कार्यवाही नंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
या कार्यवाहीत तब्बल ८  जेसीपी आणि १२  टिप्पर जप्त करून दहा लोकांना अटक करण्यात आली असून  कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर महसूल विभाग यांच्या वर किती दंडात्मक कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मागील कित्येक महिन्यापासून जिल्ह्यातील वाळू घाट बंद आहेत. मात्र असे असले तरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. त्यामुळे काल गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात एक बैठक घेऊन अवैधरीत्या सुरु असलेल्या वाळू उपशावर कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.
मात्र वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांनी या अधिकार्‍यांवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार हजार रुपये रोजीचे माणसं प्रत्येक गावात ठेवलेले आहेत.  त्यामुळे अधिकारी कार्यवाहीसाठी निघताच त्याची इत्थंभूत माहिती ही घाटावर पोहोचते आणि अधिकाऱ्यांना बऱ्याचदा खाली हाताने परत यावे लागते.
यावर उपाय शोधत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नामी शक्कल लढवत खाजगी गाड्यातून घाटावर जाण्याचे ठरविले त्यासाठी एका गाडीला नवरदेवाच्या गाडी प्रमाणे सजविले आणि तिन्ही गाड्यांवर मॅरेज पार्टी सहपरिवार असे बॅनर लावले आणि या तिन्ही गळ्यात मध्ये जवळपास पंधरा लोकांनी पवनी तालुक्यातील खातखेडा गावात असलेल्या रेती घाटांवर रात्री बारा वाजता धाड घातली.
वाळू माफियांच्या खबऱ्यांना याचा साधा गंध ही लागला नाही त्यामुळे ही कार्यवाही यशस्वी ठरली.  या कारवाईमध्ये एक नाही दोन नाही तब्बल आठ जेसीपी, बारा टिप्पर असे एकूण तीन कोटी साठ लाखांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.  तसेच  चालक मालक असलेल्या दहा लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र हा अवैधरित्या वाळू घाट चालविणारा वाळू माफिया कोण यांची माहीती अजूनही मिळाली नसून त्याला अटक करून त्याच्यावरही कारवाई होईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कार्यवाही नंतर महसूल विभागातर्फे दंडात्मक कारवाई झाली तर शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो त्यामुळे महसूल विभाग नेमकी कोणती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येणाऱ्या काळात जिल्ह्यातील इतरही ठिकाणी अवैध वाळू घाटावर अशाच पद्धतीने कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे वाळू माफियांचे आणि त्यांच्या खबऱ्यांचे  धाबे दणाणले आहे.
या कार्यवाहीत जेसीबी चालक परसराम महादू महादे रा सोनेगाव, टिप्पर चालक लीखीराम बस्तीराम शेंद्रे बीडगाव, दीपक मधुकर शेंडे रा कळमना नागपूर, शरद देविदास कुरुडकर, रा डोंगरगाव, मेनसिंग मंगलसिंग खंडाते रा साईबाबा नगर नागपूर, स्वप्नील नथुजी मांढरे रा पाचगाव, शिशिर निळकंठराव झाडे रा टाकडी नागपूर, लियाकत आली मुबारक अन्सारी रा साईबाबा नगर नागपूर, नौशाद राहेम्तुल्ला खान रोशनबाग खरबी नागपूर यांना अटक करण्यात आली असून दहा चालक फरार आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक निरीक्षक नियंत्रण चंद्रशेखर चकाटे यांनी केली असून फिर्यादी चंद्रशेखर चकाटे यांचे तक्रारीवरून पवनी पोलिसात कलम ३७९, ३४ भादवी सहकालाम  ४८ (७) (८) महाराष्ट्र महसूल सहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.

 
  Print


News - Bhandara | Posted : 2020-03-06


Related Photos