स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, ५ मार्च २०२० रोजी अटक केली आहे.  जिल्ह्यातील २० ते ४० वर्षांपासून आरोपी मिळून येत नसल्या कारणास्तव न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असल्याने त्यांच्या निर्गतीमध्ये अडचणी येत असल्याबाबत न्यायालयाने पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कळविले. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रकरणाचे गांभिर्य बघून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांच्या अधीनस्त विशेष पथकाची निर्मिती करून त्यांना प्रलंबित असलेल्या एकूण ९५ सुप्त नस्ती प्रकरणातील आरोपींचे निरंतर वाॅरंट तामिलीबाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेवून स्वतःची ओळख लपवून इतर विभागातील असल्याचे भासवून वाॅरंटवर नमूद असलेल्या पत्त्यांवर तेथील स्थानिक लोकांना विश्वासात घेवून आरोपीबाबत माहिती संकलित करून मागील 35 वर्षांपासून स्वतःची ओळख लपवून व स्वतःचे खरे नाव बदलवून गुंजेवाही, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे वास्तव्य करीत असल्याच्या माहितीवरून पोलिस पथक नमूद आरोपीचा सदर ठिकाणी शोध घेवून त्या ठिकाणी सापळा रचला व नमूद आरोपीची खात्री केली असता वाॅरंटमधील नमूदप्रमाणे त्याचे नाव रमेश तुकाराम सुरपाम रा. पोटेगाव, ता. जि. गडचिरोली असे असल्याची खाती झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे पोलिस विभागास व न्याय विभागास गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुंजेवाही ता, सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथून ताब्यात घेवून देसाईगंज न्यायालयाचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करण्यात आले. सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-05


Related Photos