महत्वाच्या बातम्या

 चिकाटी जिद्द व परिश्रमानेच निर्धारित ध्येय प्राप्त करता येते : डॉ भास्कर हलामी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : प्रभावी व्यक्तीमत्व आणि जीवन सुसह्य करणे आपल्याच हातात असते जीवनातील कोणतेही प्रश्न अनुत्तरित नाहीत आपल्या निर्धारित क्षेत्रात उद्भवणारे प्रश्न सोडविण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन निसंकोचपणे घेतले पाहिजे त्यात कोणताही न्युनगंड बाळगू नये समोर आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी चिकाटी जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर निश्चित ध्येय प्राप्ती पासून कोणीही थांबवू शकत नाही. असे प्रेरणादायी मौलिक मार्गदर्शन अमेरिकेतील वरिष्ठ संशोधक डॉ भास्कर हलामी यांनी केले. ते आदर्श महाविद्यालयात संशोधनातील संधी यावर प्रेरणादायी व्याख्यान प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मान माधवदास निरंकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. भास्कर हलामी कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी या छोट्याशा दुर्गम व आदिवासी गावातील मुळ निवासी आहेत. त्यांनी स्वतःचा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण ते अमेरिकेतील वरिष्ठ संशोधक असा आदर्शवत व प्रेरणादायी संपूर्ण जीवन प्रवास उलगडताना अविश्वसनीय गोष्टी विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. ते म्हणाले की मी दहावी बारावी अगदी साधारण गुणांनी उत्तीर्ण होणारा आणि काही काळ वाईट व्यसनाच्या आहारी गेलेला विद्यार्थी स्वतःला नियंत्रीत करून मोठे स्वप्न बघून मोठी ध्येय निश्चित करून ते प्राप्त करू शकलो. विद्यार्थ्यांना स्वतःचे उत्तम व प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी भाषा ज्ञान महत्त्वाचे आहे. तेव्हा विविध भाषा अवगत करून वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ते आवाहन स्विकारून सदैव सकारात्मक जीवन जगले पाहिजे. कला वाणिज्य व विज्ञान असा भेद न करता सर्वांसाठी जीवनात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानात उपलब्ध साधने व माध्यमांचा पुरेपूर वापर केला तर विपरीत परिस्थितीवर सहज मात करून भविष्य उज्ज्वल घडविता येते. असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी अध्यक्षीय स्थानावरून केले. यावेळी मान माधवदास निरंकारी म्हणाले की व्यक्तीच्या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही ती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी ठेवली पाहिजे. न्युनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल यशस्वी करावी याप्रसंगी डॉ भास्कर हलामी त्यांच्या आदर्शवत व प्रेरणादायी शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी शॉल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय डॉ श्रीराम गहाने यांनी केले. तर मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ जयदेव देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos