ताडगाव येथील महिला व विद्यार्थिनींनी जाळले नक्षली बॅनर


- नक्षलवाद्यांनी भूलथापा देवून महिलांवरील अन्याय थांबविण्याची भावना केली व्यक्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
भामरागड उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील ताडगाव ते आलापल्ली मार्गावरील वाय पाईंट नजीक नक्षलवाद्यांनी बॅनर व डमी भूसुरुंग लावला होता. परंतु नक्षलवाद्यांचे मनसुबे ताडगाव येथील महिला व विद्यार्थिनींनी उधळून लावत नक्षल बॅनर काढून त्याची होळी केली. नक्षलवाद्यांनी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिन साजरा करण्यासाठी दहशत पसरविणारा मजकूर व डमी भूसुरुंग लावून परिसरात दहशत पसरविण्याचा नक्षलवाद्यांचा मानस होता. परंतु ताडगाव पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींनीच नक्षलवाद्यांचे आवाहन झुगारुन लावत नक्षली बॅनर जाळले. नक्षलवादी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करून दुटप्पी भूमिका घेत असल्याचे यावेळी महिलांनी बोलून दाखविले. त्याचबरोबर एकीकडे नक्षलवादी इरपनार ता. भामरागड येथे राहणारया बेबी मडावी हिचा निर्घृण खून करतात व दुसरीकडे महिला दिन साजरा करण्याच्या नावाखाली परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात हे खपवून घेतले जाणार नाही. नक्षलवादी अल्पवयीन मुलींचा त्यांच्या देशविघातक कृत्यांसाठी करत असलेला वापर थांबवावा, बेबी मडावी जिंदाबाद, नक्षलवादी मुर्दाबादचा नारा देत उपस्थित महिलांनी तीव्र शब्दांत नक्षलवाद्यांचा निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही बळी पडणार नसल्याचे महिलांनी ठणकावून सांगितले. आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील २२ निरपराध महिलांची हत्या नक्षलवाद्यांनी केली आहे. ताडगाव पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींनी दाखविलेल्या धाडसाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतूक केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-03


Related Photos