महत्वाच्या बातम्या

 ग्रंथालय चळवळ वाढविण्यासोबतच वाचन संस्कृति रुजविण्याची गरज : आ. डॅा. पंकज भोयर


- दोन दिवशीय वर्धा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढविण्यासोबतच वाचन संस्कृति रुजवून एक सुसंस्कृत वाचनप्रिय युवा पिढी घडविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. डॅा. पंकज भोयर यांनी केले.

दोन दिवशीय वर्धा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आ.भोयर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृह आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दाते, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॅा.गजानन कोटेवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, विदर्भ साहित्य संघाचे वर्धा शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकरी सी.एस.ठवळे आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसात ग्रंथालय चळवळ मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. वाचन मानसाला परिपुर्ण करत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यात वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात वाचन चळवळ पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी वर्धा ग्रंथोत्सव महत्वपुर्ण ठरेल, असे पुढे बालतांना आ.भोयर म्हणाले. ग्रंथालय चळवळ जिवंत राहण्यासोबतच या चळवळीच्या जनजागृतीची गरज आहे. ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सुध्दा त्यांनी सांगितले.

वर्धा ग्रंथोत्सवामुळे मुलांच्या मनावर वाचनाचे संस्कार रुजविले जातील. अशा उत्सवातून चांगले सांस्कृतिक वातावरण निर्माण होते. त्यामुळे हा ग्रंथोत्सव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आधी होत असल्याने तो अतिशय महत्वपुर्ण आहे, असे आपले मनोगत व्यक्त करतांना विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दाते यांनी सांगितले.

अलिकडे मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. परंतु हा वापर चांगल्या कामासाठी केल्यास त्याचे चांगले फायदे देखील आहे. पालकांनी आपल्या मुलांना बालपणातच वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. चांगला मनुष्य बनायला चांगले वाचन महत्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. बालपणी ही आवड पालकच निर्माण करू शकतात, असे सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितले.

प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले. ग्रंथालय चळवळ व वाचन संस्कृति रुजविण्यासाठी हा ग्रंथोत्सव दरवर्षी राज्यभर आयोजित केला जातो, असे त्यांनी सांगितले. प्रा.डॅा.गजानन कोटेवार, संजय इंगळे तिगावकर, प्रदीप बजाज यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस मान्यवरांच्याहस्ते ग्रंथ दालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकाशनांची ग्रंथ दालने लावण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला संदीप चिचाटे, जीवन बांगळे, दिलीप रोकडे, आशिष पोहने, विजय बाभुळकर, प्रतिक सुर्यवंशी, चंद्रकांत डगवार, सुधीर गवळी, स्वाती चुटे, मनिष जगताप, स्वप्निल वैरागडे, शरद ढगे यांच्यासह साहित्यिक, कवी, वाचन, पुस्तक विक्रेते, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार ज्योती भगत यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos