लोकबिरादरी प्रकल्पातर्फे अतिदुर्गम गोपनार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गोपनार गावात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे परीसरातील आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सूविधा मिळाव्या यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले. सदर प्राथमिक केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरनोबत यांनी केले. यावेळी जेष्ठ समाजसेविका डॉ.सौ.मंदाकीनी आमटे, लोकबिरादरी हाॅस्पीटल हेमलकसाचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साहित्यिक व जेष्ठ कार्यकर्ते विलास मनोहर, सौ.रेणुका मनोहर, डॉ.निलोफर बिजली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम, अतिमागास व संवेदनशील परिसर म्हणून गोपनारची ओळख आहे. या भागात गोपनार, होड्री, लष्कर, आलदंडी, मोरडपार, धिरंगी इत्यादी आदिवासी गावे आहेत. सदर भागात आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाहीत. लाहेरी, भामरागड व हेमलकसा येथील अंतर लांब असल्याने वेळेवर आरोग्याच्या सुविधा तात्काळ मिळू शकत नाही. प्रसंगी रुग्णांना अतिशय त्रास होतो. बऱ्याच वेळा रुग्णही दगावतो. ही समस्या असल्याचे लक्षात येताच लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे व डॉ.अनघा आमटे या उभयतांनी परिसरातील मध्यवर्ती ठिकाण गोपनार येथे लोकबिरादरी प्रकल्पातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी दवाखान्यासाठी पक्की सिमेंटची इमारत व रुग्णांसाठी सेड उभारला. प्राथमिक उपचारासाठी औषध, साहित्य व आरोग्य सेवकांची नेमणूक केली. सदर आरोग्य केंद्र आजपासून नियमित सुरु राहून परिसरातील नागरिकांना विनामूल्य रुग्णसेवा मिळणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  उद्घाटनाच्या वेळी जगदिश बुरडकर, शारदा ओक्सा, गणेश हिवरकर, अशोक गायकवाड, प्रकाश मायकरकार, दिपक सुतार, संध्या येम्पलवार, बिरजू दुर्वा, लोकबिरादरी हाॅस्पीटलची चमू, प्रकल्पातील कार्यकर्ते व परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-26


Related Photos