आदिवासी विभागाच्या नोकर भरतीची खोटी जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल


-  सायबर सेलकडे तक्रार दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
आदिवासी आयुक्तालयाकडून विविध पदासांठी नोकरभरतीसाठी अर्ज मागविण्यात आल्याची जाहिरात गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने फेक वेबसाइटच्या माध्यातून नोकरभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत नाशिक सायबर ठाण्यात आदिवासी आयुक्तालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आदिवासी विकास आयुक्तालयाचे बोधचिन्ह वापरून खोटी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या फेक वेबसाइटमध्ये आदिवासी विभागात विविध पदांकरिता मुंबई १०३१ , पुणे ८६६ , नाशिक ७२४ , जळगाव ५७८ अशा जवळपास ३ हजार जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून खुल्या प्रकर्गाला ५०० रुपये आणि इतरांसाठी ३५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यासंदर्भातील जाहिरातही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस येताच आदिवासी आयुक्तालयाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
आदिवासी विकास आयुक्तालयाने कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता सहाय्यक, परीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई या पदासांसाठी अर्ज मागविलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी आयुक्तालयाने केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-22


Related Photos