मार्कंडा येथे महाशिवरात्री यात्रेला सुरुवात : हजारोंच्या संख्येने भावीक दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे आजपासून महाशिवरात्री यात्रा प्रारंभ झाली. वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या मार्कंडेश्वर मंदिराने आजही आपले वैभव कायम ठेवले असून आज शुक्रवार २१ फेब्रुवारीपासून १५ दिवस शिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेला जिल्ह्यातून , शेजारील जिल्ह्यातून तसेच राज्यातून व इतर राज्यातून भाविक येत असतात.
राज्याचे रोहयो मंत्री सांदीपन भुमरे यांच्या हस्ते आवाज पूजा पार पडली. गडचिरोली जिल्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील भक्त मार्कंडेय स्वामी हे देवालय भारतातील खजुराहो येथील चन्देलांच्या देवळासारखे दिसते. मार्कंडा येथील देवळे खजुराहो देवळानंतरची आणि यादव काळापूर्वीची असल्याचे मानले जाते. देवळाचा गाभारा ११०० वर्ष पुरातन असून आकर्षक नक्षीकामाने नटलेला आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर बांधलेले हे प्राचीन देवस्थान परिसरात वैनगंगा प्रवाह उत्तर वाहिनी झाल्यामुळे भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे समजले जाते.
दरवर्षी या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून भाविक येतात. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील क्षेत्र मार्कंडादेव नगरीत शुक्रवारपासून महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक भक्तांची मांदियाळी राहणार आहे. मंदिर परिसरामध्ये पूजा, आरती व भाविकांना, यात्रेकरूंना मंदिरात जाण्याकरीता व विशिष्ट ठिकाणीच पूजा करण्याची व्यवस्था मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टकडून केलेली आहे. 'हर हर महादेव'चा गजर करत लाखो भाविक या यात्रेत सहभागी झाले. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील या प्रसिद्ध यात्रेसाठी पोलीस, महसूल प्रशासन व होमगार्ड यांच्या सहकार्याने या यात्रेत भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-21


Related Photos