मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल : जयंत पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
  'सार्वजनिक वाहतूक योजना तोट्यात असते असा अनुभव आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे तोट्यात आहे,' असं सांगतानाच, राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात 'पांढरा हत्ती' ठरेल,' असं भाकित राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज वर्तवले आहे . 
ते पुण्यात बोलत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे राज्य सरकार स्वतःच्या खिशातून पैसे देत होते. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे ही तोट्यात आहे. मेट्रो प्रकल्पांचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होत असलेल्या भेटीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. 'भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांची भेट आवश्यक असते. हा संवाद चालू राहिला पाहिजे. हा संवाद चालू राहण्यासाठीच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटणार आहेत,' असं ते म्हणाले. 'केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद नाही. महाराष्ट्र हे भारतातीलच राज्य आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करणार नाही,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमचं सरकार आल्यापासून केंद्रानं जीएसटीचा फरक उशिरा द्यायला सुरुवात केलीय. राज्य सरकारला केंद्रीय करातला वाटा उशिरा मिळत आहे. कारण केंद्र सरकारची आर्थिक अवस्था फारशी बरी नाही, असा माझा अंदाज आहे. ते मुद्दाम उशिरा निधी देत आहेत, असं माझं मत नाही. राज्याचा हक्काचा वाटा आहे, तो वेळेवर मिळावा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करतील, असंही ते म्हणाले.
  Print


News - Rajy | Posted : 2020-02-21


Related Photos