जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत


- गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय - अजय कंकडालवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / गडचिरोली :
गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची येथील जिल्हा परिषद कार्यालयात विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्या, जनतेचे प्रश्न व इतर महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश टाकला. अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर लागलीच जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांना भेटी देऊन समस्या जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील विविध समस्या व प्रश्ने जाणून घेत ते प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे मत कंकडालवार यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. मागासलेला जिल्हा अशी गडचिरोलीची असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आगामी काळात जिल्ह्यातील जनतेचे मुलभूत प्रश्ने व समस्या सोडविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात असलेली अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे. शिक्षण, आरोग्य, बांधकाम व इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. शाळा, रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे बांधकाम करणे, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनात सुसूत्रता आणणे, प्रशासकीय कामांना गती देणे आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन चालविणे याकडे सुद्धा आपण आगामी काळात जातीने लक्ष देणार आहोत, कामानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयात येणारया जनतेची कामे तातडीने करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. अधिकारी व कर्मचारी यांच्या सुद्धा समस्या सोडवून प्रशासकीय कामकाज करताना त्यांना काय अडीअडचणी येतात हे जाणून त्यात सुधारणा करण्यावर आपला विशेष भर राहील. जिल्ह्यातील सर्व ५१ जिल्हा परिषद क्षेत्रांना भेटी देवून व सर्व जिल्हा परिषद सदस्यांशी समन्वय साधून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळवून आणून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा आपण कसोसिने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुलाखतीदरम्यान बोलून दाखविली आहे.
शिक्षण व आरोग्याच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : मनोहर पोरेटी
गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य विषयक समस्या अधिक आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षण व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांकडे आपण जातीने लक्ष देवून त्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी शाळांच्या इमारती पडक्या स्थितीत आहेत. त्या ठिकाणी इमारती व संरक्षण भिंतीचे बांधकाम करून विद्याथ्र्यांकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या जिल्ह्यात आरोग्याची समस्या सुद्धा गंभीर आहे. त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष देवून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आरोग्य पथकाकरिता इमारती बांधण्यात येवून त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.  Print


News - Mulakhat | Posted : 2020-02-20


Related Photos