कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव कडाडले : इतिहासात पहिल्यांदाच दराने गाठली ही उंची


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी  दिल्ली :
देशाच्या इतिहासात सोनं पहिल्यांदाच प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. गुरूवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रूपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४३,१७० रूपयांवर पोहचला. लग्नसराईचा मोसम आणि कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळं सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याच्या भावात मागील आठ दिवसांत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भावांतही वाढ झाली आहे. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा भावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा फटका देशांतर्गत सराफ बाजारांतही पाहायला मिळतोय. त्यातच चीनमधील जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळेही सोन्याचे भाव कडाडले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) सोन्याची किंमत १,६०२ डॉलर इतकी झाली आहे, असे एचडीएफसी सेक्युरिटीजचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल यांनी सांगितले.
  Print


News - World | Posted : 2020-02-20


Related Photos