वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केले 'तारुण्यभान ते समाजभान' वर मंथन


- निर्माण १० शिबीर : अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना घेऊन निर्माण १० मालिकेतील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पहिले शिबीर सर्च(शोधग्राम) येथे ८ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. शिबिरांतील विविध सत्रांमधून युवांनी आजची समाजातील अनेक वैद्यकीय प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्यासाठी विविध कृती कार्यक्रम तयार केले. सोबतच गडचिरोलीच्या विविध खेड्यांमध्ये जाऊन ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचाही शोध घेतला. देशभरातील ६७ वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झाले होते.   
महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांनी सुरू केलल्या निर्माण उपक्रमाची ९ शिबिरे आतापर्यंत पूर्ण झाली आहे. दहाव्या सत्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पहिले शिबीर ‘तारुण्यभान ते समाजभान या संकल्पनेला धरून होते. स्वतःच्या भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज युवांमध्ये तयार होणे,  स्व चा विस्तार, स्व च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांची युवांना जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे, अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी ही शिबिरांची मुख्य उद्दिष्टे होती.
वैद्यकीय शिक्षण घेत असलेले ६७ युवक-युवती यात सहभागी झाले होते. एम्स दिल्ली, एम्स ऋषिकेश, एम्स रायपूर, जिपमर पॉन्डिचेरी या राष्ट्रीय वैद्यकीय संस्थांसह महाराष्ट्रातील १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. सामजिक काम करण्यामागच्या माझ्या प्रेरणा काय, माझी मुल्ये कोणती, ती मी कशी शोधू, माझ्या आर्थिक गरजा कोणत्या, त्या मी कशा ठरवू,  मी काम करण्यासाठी क्षेत्र कोणत्या निकषांवर निवडू असे अनेक प्रश्न समजून घेत वैद्यकीय युवांनी त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रवास या शिबिरादरम्यान केला.
डॉ. अभय बंग यांच्याशी युवांनी प्रश्नोतरीच्या स्वरूपात संवाद साधला. ‘आजच्या वैद्यकीय शिक्षणाकडे वळून बघताना’ आणि ‘आरोग्य स्वराज्य’ या महत्त्वाच्या विषयांवर डॉ. अभय बंग यांनी  प्रकाश टाकला. सामाजिक विषमता हा विषय सुनील चव्हाण यांनी आजच्या परिभाषेत समजावून सांगितला. शिबिराच्या अंतिम टप्यात पुढील ६ महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ आराखडा सर्वांनी तयार केला. निर्माण टीम मधील अमृत बंग, गजानन बुरडे, अदिती पिदुरकर, प्रेरणा सेठिया, आरती बंग, सतीश गिरसावळे, मंदार देशपांडे यांनी संपूर्ण शिबिराचे नियोजन केले.
 

ग्रामस्थांशी मुक्त संवाद

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गडचिरोलीतील गावांना भेटी देत ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. गटा-गटांनी गावातील विविध प्रश्नांविषयीची निरीक्षणे आणि कृती कार्यक्रम सादर केले. शिबिराच्या अंतिम टप्यात पुढील २५ वर्षात कुठल्या सामाजिक प्रश्नांवर काम करायचे. हे काम करताना स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील, कुठल्या गोष्टी शिकाव्या व समजून घ्याव्या लागतील याचा विचार करून आगामी सहा महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ आराखडा शिबरात सहभागी युवांनी तयार केला. 

कट प्रॅक्टीस न करण्याचा निर्धार...!

देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धेत प्रचंड वाढ झाल्याने कट प्रॅक्टीस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या कट प्रॅक्टीसचा तोटा मोठ्या प्रमाणात रुग्णांना होत असून रुग्णांचे आर्थिक नुकसान होत आहे.
कमिशन देऊन अथवा घेऊन सुरू असलेली वैद्यकीय सेवा म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’. हे कमिशन कधी एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टरला दिले जाते तर कधी औषधी विक्रेत्याकडून, रक्त व लघवी तपासणी करणार्‍या लॅब चालकाकडून, एक्स-रे सोनोग्राफी करणार्‍यांकडून त्यांच्याकडे पेशंट पाठवणार्‍या डॉक्टरांना दिले जाते. हे कमिशन केवळ पैशातच नाही तर वस्तू, सेवा आणि विशेष म्हणजे पार्टीच्या स्वरूपातही दिले जाते, हे सध्याचं दुर्दैवी वैद्यकीय वास्तव आहे.
शिबिरामध्ये कट प्रॅक्टिस विषयी प्रदीर्घ चर्चा झाली. कट प्रॅक्टिसचे अनेक पैलू आणि कंगोरे शिबिरार्थ्यानी समजून घेण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस डॉक्टरांची डागाळत जाणारी प्रतिमा व काही डॉक्टरांच्या लोभामुळे रुग्णांची होणारी अवहेलना थांबवायची असेल तर भावी डॉक्टरांनी या विषयाला वाचा फोडण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यांवर शिबिरात एकमत झाले. ‘मी कट प्रॅक्टिसच्या विरोधात आहे एवढेच म्हणून न थांबता भविष्यात मी या गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही, पाठिंबाही देणार नाही, मूक संमती देत बघ्याची भूमिका देखील घेणार नाही’, असा निश्चय सहभागी प्रत्येक शिबिरार्थ्यानी घेत कट प्रॅक्टिस विरोधी तयार केलेल्या पोस्टर्स वरती स्वाक्षरी केली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-20


Related Photos