दुश्मनांच्या महिलांचाही सन्मान केला म्हणून शिवाजी महाराज आदरणीय आहेत : इंजि. तुषार उमाळे


- येनापूर येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / येनापूर :
जगाच्या पाठीवर ८५० हून अधिक राजे महाराजे होऊन गेलेत. परंतु केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचीच जयंती, पुण्यतिथी जगात साजरी होते. कारण ज्या काळात माता - भगिणींचा अक्षरशः लिलाव केला जात होता, त्या काळात  माता जिजाऊंनी घडविलेल्या शिवाजी महाराजांनी दुश्मनांच्याही महिलांचा सन्मान केला. यामुळेच शिवाजी महाराज आम्हाला आजही आदरणीय आहेत, असे प्रतिपादन शिव - फुले - शाहू - आंबेडकर विचारवंत तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष इंजि. तुषार उमाळे यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथे शिव - फुले - शाहू - आंबेडकर विचारमंच येनापूरच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती उत्सानिमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. तुषार उमाळे बोलत होते. याप्रसंगी सप्तखंजेरीवादक रवीपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन युवा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चंदाताई नितीन कोडवते यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी होते. सहअध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते डी.जी. गेडाम, सिनेट सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य अजय लोंढे होते. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, अ‍ॅड. दिनेश राऊत व पोलिस जवान भारत तिमाडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच नीलकंठ पाटील निखाडे, अड्याळ ग्रा.पं. चे उपसरपंच निकेश गद्देवार,  सोमनपल्ली ग्रा.पं. चे सरपचं आनंदराव पिदुरकर, बाळु निखाडे, मुकेश पत्तीवार, किरण दुधे, पोलिस पाटील लोभाताई गेडाम, दीपक पुच्छलवार, राजु झाडे, विश्वास  बोमवंटीवार, मोरेश्वर येडलावार, संदीप कुरवटकर, भास्कर जवादे, ज्योती बावनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना इंजि. तुषार उमाळे म्हणाले, ओबीसींसांठी ३४० कलम अंमलात आणून ओबीसींची स्वतंत्र जनगणना करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ओबीसींचा विकास शक्य नाही. सध्या महिलांवरील अत्याचारात मोङ्ग्या प्रमाणात वाढ होत आहे. मुलींना भररस्त्यावर पेटवून दिले जात आहे. यामुळे आताच्या परिस्थितीत शिवराज्य अस्तित्वात येणे अत्यावश्यक झाले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. राजकीय मंडळी केवळ सर्व प्रकरणांचा राजकीयदृष्ट्या वापर करीत आहेत. यामुळे शिवरायांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराची आजही गरज असल्याचे मत इंजि. तुषार उमाळे यांनी व्यक्त केले.   स्त्रीयांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात विकास साधला आहे. परंतु पुरूषी मानसिकतेने आजही त्यांना जखडून ठेवले आहे. जो पर्यंत या मानसिकतेतून महिला बाहेर पडून महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबणार  नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात शिवशाही येणार नाही, असेही इंजि. उमाळे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मुख्याध्यापक धुरके यांनी केले तर आभार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप तिमाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पत्तीवार, दर्शन बांगडे, निखील दुधे, सुरज बोमवंटीवार, मुन्ना गोंगले, अविनाश पुच्छलवार, तन्मय दुधे आदींनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-19


Related Photos