आमचा पद्मश्री पुरस्कार दारूबंदीसाठी लढणार्‍यांचा : डॉ. अभय बंग


- चामोर्शी येथे तालुकस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्ह्यातील दारूबंदीसाठी १९८७ पासून सुरू झालेल्या आंदोलनात चामोर्शी तालुका सुरुवातीपासूनच सक्रिय होता. कारण येथील लोकांना दारूबंदी हवी होती. महिलांचा या आंदोलनात पुढाकार होता. त्यामुळे शासनावर दबाव वाढून १९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी लागू झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झालेल्या मुक्तिपथ अभियानाने या दारूबंदीला बळ दिले. या अभिमानात सहभागी झालेल्या चामोर्शी तालुक्यातील स्त्रिया दारूबंदीसाठी संघर्ष करीत आहे. तब्बल ८९ गावांतील महिलांनी विक्री बंद केली आहे. त्यामुळे आमचा पद्मश्री पुरस्कार अशाच धाडसी महिलांचा व गाव संघटनांचा आहे, असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी केले.
मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. डॉ. अभय बंग म्हणाले, राज्यातच नाही तर देशातही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आपण वारंवार ऐकतो. या घटनांमध्ये एक साम्य आढळते. हिंसा करताना आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे हे हिंसाचार थांबवायचे असेल तर दारुला नाही म्हणणे आवश्यक आहे. चामोर्शी तालुक्याच्या ८९ गावांनी ही हिम्मत दाखवली आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, दारूबंदीसाठी असलेली तळमळ या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ही गावे आणि येथील महिला व पुरुष अभिनंदनास पात्र आहेत.
या जिल्ह्याला मागासलेला समजले जाते. पण येथील लोकांचे दारूबंदीसाठी चे प्रयत्न पाहता हा गडचिरोली जिल्ह्याचा पराक्रम आहे जो अन्यत्र कुठेही दिसून येत नाही. शेजारच्या चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी अयशस्वी झाल्याची हिला उडवली जात आहे. पण दारूबंदी केवळ कागदावर करून चालत नाही तर ती दृश्य स्वरुपात येण्यासाठी तिची प्रभावी अंमलबजवणी आवश्यक ठरते. गडचिरोलीच्या सहाशे गावांनी हिमतीने, संघर्षाने व कायद्याचा आधार घेऊन दारूबंदी साध्य केली आहे. ही पराक्रमाची बाब असून त्याचा विजयोत्सव करण्यासाठीच आपण सगळे जमलो असल्याचे डॉ. बंग आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
७२ गावांतील ३३७ महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते. अनेकांनी दारूबंदी करताना आलेले अनुभव, मिळालेले यश-अपयश, करावा लागत असलेला संघर्ष याविषयी मनोगत व्यक्त केले. अनेक गावांमध्ये अद्याप दारूबंदी पूर्णपणे साधी झालेली नाही. या सर्वांच्या प्रश्नावर चर्चा करून सामूहिक प्रयत्न आणि मजबूत संघटनेतूनच दारूबंदी साध्य होईल असे डॉ. बंग यावेळी म्हणाले. चामोर्शी तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, जितेंद्र कुनघाडकर यांनी संपूर्ण संमेलनाचे यशस्वी नियोजन केले.

खर्र्‍याचे भूत उतरवणे गरजेचे

दारूबंदीसाठी गावागावातील महिलांचा संघर्ष सुरूच आहे. पण खर्रा या पदार्थाचे व्यसन सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. पुरुषांसोबतच स्त्रिया आणि लहान मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहे. आजघडीला जिल्ह्यात वर्षभरात लोक तब्बल ३०० कोटीं खर्रा या तंबाखूजानी पदार्थावर खर्च करतात. विशेष म्हणजे सरकारचे या जिल्ह्यासाठीचे बजेटही तीनशे कोटीच्या घरात आहे. टीवायएएमयूएलई एपीएएलवायए जिल्ह्यात खर्र्‍याचे सरकार असल्याची स्थिती आहे. यातून पानठेलाधारकांचे घर भरते पण या बदल्यात जिल्ह्यातील लोकांना तोंडाचा कॅन्सर, लकवा, रक्तदाब असे आजार मिळतात. त्यामुळे खर्रा या विषारी पदार्थाचे भूत उतरवून त्याची सवय सोडणे गरजेचे आहे असे डॉ. बंग मार्गदर्शनात म्हणाले.  

यंदाही मार्कंडा यात्रा दारू व तंबाखूमुक्त करू

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव मंदिर चमोरशी तालुक्यात आहे. दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. गेल्या तीन वर्षांपासून ही जत्रा मुक्तिपथ, मार्कंडा गावकरी, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण दारू आणि तंबाखूमुक्त केली आहे. यंदाही यात्रा आपल्याला दारू व तंबाखूमुक्त करायची आहे. चामोर्शी तालुक्याचा हा संदेश संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर परजिल्ह्यात आणि राज्यांतही आपल्याला पोहोचवायचा आहे. त्यासाठी यावर्षी देखील आपल्याला ही यात्रा व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन डॉ. बंग यांनी उपस्थितांना केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-18


Related Photos