तिरोडा येथील वनविभागाचा लेखापाल व खाजगी इसम अडकला एसीबीच्या जाळ्यात


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
तिरोडा येथील वनविभागाचे लेखापाल दिवाकर धांडे (जि. गोंदिया) व खाजगी इसम राजीव झिबल मस्के यास ४ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया येथील पथकाने अटक केली आहे. तक्रारदार हे ठाणेगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथील रहिवासी असून ते व्यवसायाने लाकूड ठेकेदार आहेत. तक्रारदाराने चुरडी येथील दोन शेतकरयाच्या शेतजमिनीवरील सागवान व आडजात झाडे विकत घेतली आहेत. सदर झाडांना कापून त्याचा माल तयार करण्यात आलेला आहे. सदर मालाची वाहतूक करण्याची परवानगी तिरोडा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयातून मिळवून घेण्यासाठी तक्रादार वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथील लेखापाल दिवाकर धांडे याच्याकडे गेले असता त्यांनी सदर मालाची वाहतूक करण्याच्या परवानगी प्रस्तावाच्या कागदपत्रांची छाणनी करून सदर प्रस्ताव उपवनसंरक्षक गोंदिया येथे पाठविण्याकरिता प्रती प्रस्ताव २ हजार याप्रमाणे ४ हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली. मात्र तक्रारदारास धांडे यास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिस उपअधीक्षक रमांकात कोकाटे यांनी सापळा रचून १७ फेब्रुवारी २०२० रोजी ४ हजार रुपयांची लाच रक्कम खाजगी इसम राजीव मस्के याच्यामार्फत स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्लवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशीकांत पाटील, पोलिस हवालदार शिवशंकर तुंबळे, रंजीत बिसेन, दिगांबर जाधव,  नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, देवानंद मारबते यांनी केली आहे.
  Print


News - Gondia | Posted : 2020-02-17


Related Photos