व्यसनमुक्ती संमेलनात चंद्रपूर दारूबंदी कायम ठेवण्याचा प्रस्ताव पारित : ३३७ महिला व पुरुषांचा सहभाग


- दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी गरजेची 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी :
मुक्तिपथ अभियानांतर्गत येथील तालुका कार्यालयाद्वारे शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. या संमेलनात तालुक्यातील दारूबंदीबाबत चर्चा करतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा व त्याची प्रभावी अंमबजावणी करा, असा एकमुखी प्रस्ताव संमेलनात उपस्थित ७२ गावातील ३३७ महिला व पुरुषांनी हात उंचावून पारित केला.
या प्रस्तावानुसार गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. त्यानंतर २०१६ पासून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ प्रकल्प सुरू आहे. जिल्ह्यातील सहाशे गावे पूर्णपणे दारूमुक्त आहेत. ज्या गावात चोरून-लपून दारू सुरू आहे ती बंद व्हावी यासाठी गावागावात ग्रामसभा व गाव संघटना काम करत आहे. शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावर गडचिरोलीत येणारी अवैध दारू थांबली. पण आता चंद्रपूरची दारूबंदी हटवा, अशी चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत एक समिती नेमली आहे.  ‘आमची मागणी  आहे की, चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी कायम राहावी, याउलट दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्यास गडचिरोली जिल्ह्यावर आणि आमच्या जीवनावर याचा विपरीत परिणाम होईल. जिल्ह्याच्या सीमेवर दुकाने सुरू होतील. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांवर हा मोठा अन्याय   होईल. चंद्रपूरच्या दारुविक्रेत्यांची घरे भरतील पण आमचे संसार उद्ध्वस्त होतील.  म्हणून गडचिरोली  जिल्ह्याच्या आम्ही माहिला या प्रस्तावाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी कायम राहावी, दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ही मागणी करीत आहोत.' असे प्रस्तावात नमूद आहे. 
संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी सर्वांसमक्ष हा प्रस्ताव वाचून दाखवला. मुक्तिपथ संचालक मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर यांच्यासह उपस्थित ७२ गावातील ३३७ महिला व पुरुषांनी हा पारित केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, ओबीसी, मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना प्रस्तावाची प्रत पाठविण्यात आली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-16


Related Photos