शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाका : राज्य सरकारने दिला आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जयपूर :
राजस्थान सरकारच्या एका निर्यणामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. अशोक गहलोत यांच्या सरकारने सावरकरांचे फोटो काढून टाकण्याचा आदेश देणारे एक पत्रकच शाळांसाठी जारी केलं आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटलं आहे.
भाजपाने राजस्थान सरकारच्या या निर्णयाचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहेत असा आरोप भाजपाने केला आहे. राज्यातील सरकारी शाळांमधून सावरकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढू देणार नाही असा इशाराच राजस्थानमधील भाजपाच्या नेत्यांनी दिला आहे.
राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. “काँग्रेस सरकारला राज्यातील सरकारी शाळांमध्ये केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहू इच्छित आहे. मात्र भाजपा हे कधीच सहन करणार नाही,” असा इशाच देवनानी यांनी दिला आहे.
गहलोत सरकारने सरकारी शाळांमधील सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही काँग्रेसचे मत आहे. त्यामुळेच हे फोटो काढण्याचे फर्मान राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने जारी केलं आहे.  Print


News - World | Posted : 2020-02-13


Related Photos