२९ फेब्रुवारी पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ५ दिवसांचा आठवडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. २९  फेब्रुवारीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्यांद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
महासंघाच्या वतीने कुलथे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यात केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. ४५ मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितलं होतं.
या प्रस्तावावर आज बुधवार १२  फेब्रुवारीला  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळानं पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. या निर्णयाची अमलबजावणी महिना अखेरीस म्हणजेच २९ फेब्रवारीपासून करण्यात येणार आहे.

मुंबईसह सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ

सध्या  बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी  ९. ४५  ते सायं. ५. ३०  अशी आहे.  ती आता ९.४५  ते सायं. ६.१५  अशी होईल.  शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९. ३०  ते सायं.६. ३० अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी देखील ही वेळ ९. ४५  ते सायं.६. १५  अशी राहील.  बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ५.४५  अशी कामाची वेळ सध्या आहे.  मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयाना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १  ते २  या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.

यांना लागू नाही

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही. 

ज्या कार्यालयाना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही त्यांची नावे पुढील प्रमाणे-

अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार.           

शैक्षणिक संस्था : शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने.

जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा.  नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी. 

सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर. महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे.

सामान्य प्रशासन विभाग : शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग. कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : शासकीय मुद्रणालये. कौशल्य व उद्योजकता विकास : सर्व आयटीआय.

केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे.  सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे.  तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाना वेळ देणे शक्य होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २८८  होतात.  भोजनाचा ३०  मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन ७  तास १५  मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात.  यामुळे एका महिन्यातील कामाचे तास १७४  तर एका वर्षातील कामाचे तास २०८८ इतके होतात.
पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २६४ होतील.  मात्र, कामाचे ८  तास होतील.  परिणामत: एका महिन्यातील कामाचे तास १७६  तर वर्षातील कामाचे तास २११२ इतके होतील.  म्हणजेच प्रतिदिन ४५  मिनिटे, प्रतिमहिना २  तास आणि प्रतिवर्ष २४  तास इतके कामाचे तास वाढतील.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-12


Related Photos