२०१९ या वर्षात मुक्तिपथ अभियानाअंतर्गत ९७७ व्यसनींनी घेतले गावातच उपचार


- जनजागृती : स्वतःचे व्यसन सोडविण्यासाठी गावकर्‍यांचा पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्च मधील मानसिक आरोग्य विभागाद्वारे मुक्तिपथ अभियानाअंतर्गत आठवडी क्लिनिक आणि गावपातळीवर एक दिवसीय शिबीरे घेतली जात आहे. २०१९ मध्ये वर्षभरात झालेल्या ४७  शिबिरात आजवर तब्बल ९७७ व्यसनींवर गावातच उपचार झाले आहे. विशेष म्हणजे यात केवळ पुरुषांनीच नाही तर काही महिलांनीही उपचार घेतले.
दारूचे व्यसन हा आजार आहे आणि उपचाराने तो बरा होतो. त्यामुळे अशा व्यसनींवर उपचारासाठी सर्च मध्ये मानसिक आरोग्य विभागांतर्गत पूर्वीपासूनच १२ दिवसीय निवासी शिबीर सर्च मध्ये घेतले जाते. हे शिबीर दारूच्या खूप जास्त आहारी गेलेल्या व्यसनींसाठी असते. पण दारूचे व्यसन असलेल्या २० टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. ८० टक्के रुग्ण समुपदेशन व साध्या औषधोपचाराने व्यसनातून बाहेर पडू शकतात. त्यामुळे सर्च द्वारे मुक्तिपथ अंतर्गत गडचिरोली, आरमोरी, वडसा, चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यात एक दिवसीय व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले. तालुक्यालगत असलेल्या गावांतील व्यसनी रुग्णांना उपचार घेणे यामुळे सोपे झाले. मुक्तिपथ कार्यकर्ते गावागावात दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करतानाच व्यसन उपचाराविषयीही माहिती देतात. यातूनच गाव पातळीवरील व्यसन उपचाराची मागणी मुक्तिपथ गाव संघटनांकडून होऊ लागली.
मागणी पाहता गावांमध्ये व्यसन उपचार शिबिराचा रीतसर ठराव घेऊन एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरे घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दारू सोडण्याची इच्छा असलेल्या व्यसनींवर गावातच उपचार शक्य होत आहे. सोबतच समुपदेशक सातत्याने व्यसनींच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करीत असतात. गावाच्या दारूबंदीलाही यामुळे बळ मिळत आहे. २०१९ मध्ये वर्षभरात जिल्ह्यातील बाराही तालुक्यात एकूण ४७ शिबिरे झाली आहेत, ज्यामध्ये देसाईगंज मधील १४१, आरमोरी १३९, कुरखेडा ८४, कोरची ३६, धानोरा ४१, गडचिरोली ७६, चामोर्शी ११३, मुलचेरा ३५, एटापल्ली १९७, भामरगड ६६, अहेरी १७ तर सिरोंचा येथील ३२ अशा एकूण ९७७ गावकर्‍यांनी व्यसन सोडण्यासाठी उपचार घेतले आहेत. सर्च येथील मानसिक आरोग्य विभागाची चमू आणि  मुक्तिपथ  तालुका कार्यकर्त्यांनी गाव संघटनांच्या सहकार्याने या शिबिरांचे नियोजन केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-12


Related Photos