अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार : दहा जणांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सोलापूर :
हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच सोलापूर इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
पीडित तरुणी सोलापुरातील एका कॉलेजात शिकते. तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे इतर मित्र मागील जुलै महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करत होते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असहाय्य अवस्थेत रडत असलेल्या या पीडितेची माहिती एका स्थानिकानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली.
पीडित मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच कारवाई करून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अन्य आरोपीची माहिती घेतली जात असून पोलीस पथकं शोधासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणातील बहुतेक आरोपी रिक्षाचालक असल्याचं समजतं. आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ (ड), पॉस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-12


Related Photos